वरळीत होणार आणखी तीन लसीकरण केंद्रे

वरळीमध्ये नवीन तीन लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. ही लसीकरण केंद्रे जी दक्षिण विभागातील प्रभादेवी, वरळी कोळीवाडा आणि लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात येणार आहेत. यामधील दोन लसीकरण केंद्रे आठवडाभरात सुरू होणार आहेत.

पालिकेच्या जी दक्षिण विभागात सध्या तीन लसीकरण केंद्रे आहेत. यातील दोन केंद्रे ही सरकारी असून एक केंद्र खासगी रुग्णालयात सुरू आहे. या तीन केंद्रांतून रोज १५०० ते २००० नागरिकांना लस देण्यात येत आहे. आर. ए. पोदार वैद्यकीय महाविद्यालय आणि ईएसआयएस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर मोफत लस दिली जात आहे. ही दोन्ही लसीकरण केंद्रे वरळी नाक्याजवळ आहेत. तर एसआरसीसी लहान मुलांच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्र हाजीअलीजवळ आहे. त्यामुळे लोअर परळ आणि प्रभादेवी परिसरातील नागरिकांना ही लसीकरण केंद्र लांब पडत होती. त्यामुळे लोअर परळ आणि प्रभादेवी परिसरातही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पालिकेकडून प्रभादेवी येथील प्रसूती रुग्णालय आणि वरळी कोळीवाड्यातील दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. तर लोअर परळ स्थानकानजीकच्या रेल्वेच्या दवाखान्यात तिसरं लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. हे केंद्र रेल्वेमार्फत चालवलं जाणार आहे.



हेही वाचा - 

पाण्याचा वापर जपून करा; मुंबईला ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

१५ दिवसांच्या संचारबंदीत काय सुरू, काय बंद? वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या