३ दिवस खाजगी रुग्णालयात लसीकरण नाही, तर 'इथं' घेता येणार लस

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील कोविड लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार शासकिय रुग्णालयांमध्ये लसीकरण शनिवारी म्हणजेच १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ आणि रविवारी, ११ एप्रिल २०२१ सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे.

महानगरपालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये दोन दिवस हे लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १० , ११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. पण  लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध झाला, तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यानं दिली आहे

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन संचालित लसीकरण केंद्रांमध्ये शनिवारी (१० एप्रिल २०२१) रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पहिले सत्र राहणार आहे. ज्या केंद्रांमध्ये नियमित दोन सत्रांचे नियोजन होत असेल अशा लसीकरण केंद्रांत दुसरे सत्र रात्री ८ वाजेपर्यंत कार्यान्वित राहिल.

यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसुतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. रविवारी (११ एप्रिल २०२१) रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण केंद्र कार्यान्वित राहतील.

  • खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १०,११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही
  • शनिवारी (१० एप्रिल २०२१ रोजी) दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पहिले सत्र
  • रविवारी (११ एप्रिल २०२१ रोजी) सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण

राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे.

तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. पिंपरी-चिंचवडमधील लसीकरण केंद्रांवरही आज पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक होता.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील लशींच्या पुरवठ्याची स्थिती सांगितली. ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी केंद्राकडून फक्त ७.५ लाख लसीचे डोस मिळाले आहेत. तर उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लशीचं वाटप झालं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या