किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी विशेष डायलिसिस विभाग सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • आरोग्य

किडनी निकामी झाल्यानंतर मूत्रपिंडामध्ये बिघाड होतो. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी शरीराबाहेर काढावं लागतं या प्रक्रियेस डायलिसिस असं म्हणतात. त्यामुळे किडनी निकामी झालेल्या रुग्णाला दर दोन दिवसांनी डायलिसिससाठी रुग्णालयात यावं लागतं. अशाच किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाने विशेष डायलिसिस विभाग सुरू केलं आहे.

या डायलिसिस विभागाचं उद्घाटन रुग्णालयाच्या संचालिका झहाबिया खोराकीवाला आणि नेफ्रोलॉजी विभागाचे संचालक व मूत्रपिंड प्रत्यारोपण फिजिशिअन डॉ. एम. एम. बहादूर यांच्या हस्ते झालं.

रुग्णांना खाटांची सोय

या विभागत एकूण १३ खाटा असून डायलिसिसची विशेष गरज असलेल्या रुग्णांसाठी ९ खाटा आहेत, तर हेपॅटायटिस बी/सी तसंच एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ३ अतिरिक्त खाटांची सोय आहे. रुग्णालयाने यामध्ये क्रॉस इन्फेक्शनचा धोका अधिक असल्या कारणाने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रक्तगटाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र खोल्या तयार केल्या आहे. यामुळे रुग्णांच्या उपचारामध्ये कोणताही अडथळा येणार नाही.

केटीव्ही डायलिसिस हे या केंद्राचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हिमोडायलिसिस आणि पेरिटोनिअल डायलिसिस उपचार पद्धतींची पर्याप्तता मापण्यासाठी केटी/व्ही हे एकक वापरण्यात येतं. एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि हेपॅटायटिस बी च्या रुग्णांवरही डायलिसिस करणाऱ्या मोजक्या केंद्रापैकी हे एक आहे.

या रुग्णालयात केटी/व्ही डायलिसिस केंद्र अतिप्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि या अत्यंत गुंतागुंतीच्या उपचारासाठी सर्वोत्तम प्रशिक्षण लाभलेले फिजिशियन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना उत्तम उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

- झहाबिया खोराकीवाला, व्यवस्थापकीय संचालक, वोक्हार्ट रुग्णालय    

पुढील बातमी
इतर बातम्या