तरुण पिढीत बळावतेय उच्च रक्तदाबाची समस्या

गेल्या काही वर्षांत नोकरी मिळविण्यापासून ती टिकविण्यासाठी स्पर्धा अनेक पटींनी वाढली आहे. तर, दुसऱ्या बाजूला सेवा क्षेत्रातील नोकऱ्या वाढल्याने बाहेरचं खाणं, फास्ट फूड, सततच बैठं काम यामुळे झोप न येणं, वारंवार छातीत दुखणं, घाबरल्यासारखं होणं, ताणतणाव वाढू लागला आहे. त्यामुळे वयाच्या पंचविशीतच तरूणांना उच्च रक्तदाबासारखे विकार आपल्या जाळ्यात ओढू लागल्याचे दिसत आहे.

17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई सेंट्रल इथल्या वोक्हार्ट रुग्णालयात एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या पाहणीत मुंबईतील 30 टक्क्यांहून अधिक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने पीडित असून त्यातील 50 टक्के जणांना पहिली 5 ते 8 वर्षे या आजाराची कल्पनाही नसल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या 10 वर्षांत उच्च रक्तदाबाच्या वयाचा आलेख खाली आला आहे. हा आजार असलेल्या 30 वर्षांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवायचे असेल तर चांगला आहार आणि विचार केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटकांचाही अनेकांवर परिणाम होतो. त्यामुळे काहींना नैराश्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाब हा शांतपणे मारणारा रोग आहे. कारण तो अनेक वर्षे तुमच्या नकळत तुमच्या बरोबर राहतो आणि तो समजायला अनेक वर्षे लागतात. ह्रदयविकार, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, पक्षाघाताचा झटका येणे, असे गंभीर धोके यामुळे संभवतात. महिलांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे.
- डॉ. बेहराम परडीवाला, फिजिशियन (इंटरनीस्ट) सल्लागार, वोक्हार्ट रुग्णालय

बदलती जीवनशैली, बदलते वातावरण आणि वाढलेला तणाव यामुळे आपल्याला भावनिक, मानसिक, आर्थिक आणि शारीरिक तणावाला सामोरे जावे लागते. यातूनच उच्च रक्तदाबाच्या विकाराला सुरुवात होते. कॉम्प्युटरसमोर तासनतास बसून राहिल्याने शरीराची हालचाल मंदावलेली असते. तसेच व्यायामही नसल्याने शरीरातील मेद वाढतो. पगार गलेलठ्ठ असल्यामुळे दारू आणि तंबाखूचे व्यसन आपोआपच जडते. अशा परिस्थितीत जर उच्च रक्तदाबाची लागण झाली, तर हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो.

जागतिकीकरणानंतर संधी वाढू लागल्या, तशा नोकरीच्या संकल्पनाही बदलल्या. कामाच्या बदललेल्या वेळा, व्यक्तिगत जीवनात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, खाण्याच्या बदललेल्या सवयी अशा अनेक गोष्टींनी व्यस्त जीवनशैलीत ताबा घेतला. बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या आपल्यापैकी प्रत्येकाचे आयुष्य धकाधकीचे बनले आहे. पण, ही चुकीची जीवनशैली आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत असून मधुमेह व उच्च रक्तदाबाला अनेक लोक बळी पडत आहेत.

त्यामुळे बदलत्या जीवनशैलीत अजिबात ताणतणाव न घेता कोणत्याही परिस्थितीकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन आपण ठेवला पाहिजे. तरच आपण सुदृढ आयुष्य जगू शकतो, असेे डॉ. परडीवाला म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या