४० व्या मजल्यावरून कोसळली लिफ्ट, १ ठार, १ जखमी

(Representational Image)
(Representational Image)

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील एका ४० मजली इमारतीचमधील लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. या जखमी रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

ग्रँट रोड येथील बाळाराम स्ट्रीटवरील सिद्धज्योती या इमारतीत ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनुभव त्रिपाठी (२६) आणि सूर्यकांत राजीव पुजारी (४३) हे दोघे जखमी झाले. मात्र, राजीव पुजारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल खान यांनी दिली आहे.

लिफ्टच्या मेंटेनन्सचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना जवळच्या गोपाळदास तेजपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोघांपैकी एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या दुर्घटनेतील जखमी अनुभव त्रिपाठी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्रिपाठी यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या