पत्री पूल वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण

कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचं सोमवारी लोकार्पण करण्यात आलं आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आदित्य ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

20 जुलै रोजी कल्याण येथील 104 वर्ष जुना असलेल्या पत्री पुलाचं आयआयटी मुंबई, केडीएमसी आणि रेल्वेने स्ट्रकरल ऑडिट केलं होतं. त्यावेळी पत्री पूल धोकादायक असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता.

भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी या पुलाच्या उद्घाटनापूर्वीच उड्डाणपूल नामकरणासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदेंना यांना पत्र लिहिले आहे. पत्रीपुलाला दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी यात त्यांनी केली आहे.

भारताच्या स्वयंपूर्ण क्षेपणास्त्र मोहिमेचे भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम हे शिल्पकार होते. तसंच ते आजही भारतीय युवा पिढीचे आदर्श आहेत. कल्याण डोंबिवलीतील दहा हजार शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संपूर्ण जन गण मन कार्यक्रमास त्यांची उपस्थिती आजही आपल्या स्मरणात आहे. एका अर्थानं त्यांचं पदस्पर्श आपल्या कल्याण-डोंबिवली शहरांना लाभलं. त्याची चिरंतन स्मृती राहावी म्हणूनच पत्रीपुलास ‘भारतरत्न कलाम सेतू’ असे नाव देण्याची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार चव्हाण यांनी केली.


पुढील बातमी
इतर बातम्या