पर्यटन स्थळांजवळील रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण होणार

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेत रेल्वेनेही ‘स्वच्छ भारत, स्वच्छ रेल्वे’ या जोड मोहिमेतून पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यटन स्थळांना जोडलेल्या स्थानकांचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. माथेरान, नेरळ आणि लोणावळा या तीन स्थानकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या तीन स्थानकांना सुशोभिकरण करून पर्यटकांची संख्या वाढविण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकांच्या भिंती, पीलर, पूल आदींना सजवल्यास याठिकाणी दाखल होणारा पर्यटकही कलेला दाद देईल, तसेच पर्यटकांना पुन्हा या पर्यटन स्थळावर भेट द्यावीशी वाटेल. सध्या मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणारे माथेरान, नेरळ आणि लोणावळा हे तीन रेल्वे स्थानक पर्यटनाच्या अनुषंगाने विकसित करण्याचा विचार सुरू आहे, असे गोयल त्यांनी सांगितले. पण, पर्यटन स्थळांचे सुशोभिकरण करण्याचे रेल्वेच्या हातात नसले तरी, तेथे जाण्यासाठी ज्या रेल्वे स्थानकाचा वापर केला जाणार आहे त्या रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण करण्याची जबाबदारी मध्य रेल्वेची आहे. त्यामुळे या तिन्ही स्थानकांचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. तसंच लोणावळ्यातील भुशी डॅम परिसर देखील भारतीय रेल्वे मालकीचा असल्याने ते विकसित करण्याचा विचार मध्य रेल्वे करत असल्याचं रवींद्र गोयल यांनी या वेळी सांगितले. 

पुढील बातमी
इतर बातम्या