म्हाडा विजेत्यांना नवीन वर्षात मिळणार घर

मुंबई - म्हाडाच्या ऑगस्ट 2016 च्या सोडतीत ज्य़ांना घर लागली आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. विजेत्यांपैकी अनेकांना नव्या वर्षांत नव्या घरात प्रवेश मिळणार आहे. सोडतीतील विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी मंडळाकडून सुरू असून, आतापर्यंत 25 हून अधिक विजेते पात्र ठरलेत. उर्वरित विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. तर दुसरीकडे 972 घरांपैकी 400 हून अधिक घरं 'ओसी' मिळालेल्या प्रकल्पातील आहेत. त्यामुळे जसजशी पात्रता निश्चित होईल तसतसा विजेत्यांना घराचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलीय. पुढील पंधरा दिवसांत आणखी काही विजेते पात्र ठरतील. त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विजेत्यांना देकार पत्र पाठवून त्यांच्याकडून घराची रक्कम भरून घेतली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांन दिली. त्यामुळे जे विजेते देकार पत्र मिळाल्यानंतर घराची रक्कम भरतील, त्यांना घराचा ताबा देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष ताबा देण्याची प्रक्रिया जानेवारी 2017 मध्ये सुरू होणार असल्यानं विजेत्यांसाठी ही नववर्षाची भेटच ठरणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या