चेंबूर येथील अमर महल जंक्शन उड्डाणपुलावरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजूवरील सांधे निखळले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद असून, पूल लवकर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता नाही. कारण हा पूल जे तंत्रज्ञान वापरून बांधण्यात आला आहे त्या तंत्रज्ञानानुसार पुलाची दुरूस्ती करणे शक्य नाही, त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा, अभियंते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाहीत. त्यामुळे अमर महल उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचा चांगलाच पेच निर्माण झाला असून, हा पेच सोडवण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने आयआयटी तज्ज्ञांची मदत घेतली आहे.
या पुलाची पाहणी करुन, अभ्यास करून पुलाची दुरूस्ती कशी करायची याचा अहवाल आयआयटी तज्ज्ञांकडून सादर झाल्यानंतर पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही काळ वाहतूक कोंडीची झळ सहन करावी लागणार आहे.
1992 मध्ये 60 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी वेगळे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. स्टीलचा वापर करत बांधण्यात आलेला हा पुलही मुंबईतील इतर उड्डाणपुलांप्रमाणेच अल्पावधीतच खराब झाला आहे.
हा पूल ज्या कंपनीकडून बांधण्यात आला ती कॉड्रिकॉन कंपनीही बंद पडली आहे. या कंपनीचे तज्ज्ञ, अधिकारीही सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे जे तंत्रज्ञान वापरून पूल बांधण्यात आला त्या तंत्रज्ञानाबद्दलचे ज्ञान अवगत असलेले अभियंते, तज्ज्ञ नसल्याने आता आयआयटीची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आयआयटी तज्ज्ञांचा अहवाल सादर होईल तेव्हा पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू होणार आहे. तोपर्यंत हा पूल बंद राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या तात्पुरता उपाय म्हणून या उड्डाणपुलाला चक्क टेकू लावण्यात आले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस या पुलाला टेकूचाच आधार असणार आहे.