मुंबई - मेट्रो-3 प्रकल्पातील घोटाळ्यांची मालिका काही संपताना दिसत नाही. दररोज नवनवीन घोटाळे वा आरोप समोर येत आहेत. त्यानुसार मेट्रो-3 प्रकल्पातील घोटाळ्यांच्या मालिकेत आता आणखी नव्या घोटाळ्याची भर पडली आहे. हा घोटाळा म्हणजे मुंबई मेट्रो रेल काँर्पोरेशन (एमएमआरसी)ने बांधकामासाठी परवानगी घेतली एका ठिकाणी, पण काम मात्र सुरू केलंय भलत्याच ठिकाणी. कफ परेड मेट्रो स्थानकासाठी प्रेसिडेन्ड हॉटलेजवळील रस्त्यावर काम करण्यासाठी एमएमआरसीला परवानगी मिळाली असताना एमएमआरसीने रस्त्याजवळील एका पार्कमध्ये, तेही ना विकास क्षेत्रातील पार्कमध्ये काम सुरू केल्याचा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आणि झांडाच्या कत्तलीविरोधातील याचिकाकर्ते झोरू बाथेना यांनी केला आहे. तर हा खूप मोठा घोटाळा असल्याचेही स्पष्ट केले आहे.
एमएमआरसीचे कार्यकारी संचालक (नियोजन) आर रमण्णा यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. जिथे काम सुरू आहे त्या ठिकाणच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या असून, सीआरझेडमध्ये ही जागा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर रोड आणि पार्क या दोन्ही ठिकाणी काम करण्यात येणार असून, त्यासाठी पालिका आणि कलेक्टर या दोन्ही यंत्रणांकडून जमीन एमएमआरसीला हस्तांतरीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एमएमआरसीने आरोप नाकारले असले तरी याचिकाकर्ते मात्र एमएमआरसी दिशाभूल करत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता एमएमआरसी विरूद्ध सेव्ह ट्री यांच्यातील वाद आणखी रंगणार हे नक्की.