अंबरनाथ एमआयडीसीमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग

(Image: ANI Twitter)
(Image: ANI Twitter)

अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर एमआयडीसीमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण आहे की दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरून आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

एमआयडीसीतील प्लॉट नंबर ४० येथील आर के वन नावाची बिस्कीट कंपनी आहे. या कंपनीला गुरूवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास  आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कंपनीला वेढा घातला.

अंबरनाथ, बदलापूर अग्निशमन विभागाच्या सात गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना आगीची झळ बसून त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये म्हणून अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. महाशिवरात्रीनिमित्त कंपनी बंद असल्याने कंपनीत कर्मचारी नव्हते. त्यामुळे सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. या कंपनीत बिस्कीट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात होता. तो संपूर्ण माल, यंत्र सामुग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून कंपनी जाळून खाक झाली आहे. 

मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचं समोर येत आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास शहापूर मधील वेहलोळी एमआयडीसीमधील प्लास्टिक कंपनी जळून खाक झाल्याची घटना घडली होती. 

पुढील बातमी
इतर बातम्या