म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास होणार

मुंबई – हाऊसिंग स्टॉकमुळे रखडलेला म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी गेल्या दहा दिवसांपासून म्हाडा भवनाबाहेर उपोषणास बसलेल्या खेरनगरवासीयांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. 2000 चौ. मीटर पर्यंतच्या भूखंडावरील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रिमियम (पैसे) आकारून परवानगी देण्याचा अध्यादेश अखेर गुरूवारी नगरविकास खात्याकडून जाहीर करण्यात आला. हा अध्यादेश जारी होताच म्हाड भवनाबाहेर उपोषणकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. हा अध्यादेश आल्याने म्हाडावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जीर्ण इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांना यामुळे दिलासा मिळाला असून, आता म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागणार आहे. दरम्यान 2000 चौ. मीटरपेक्षा मोठ्या भुखंडावरील पुनर्विकासासाठी मात्र हाऊसिंग स्टॉकच आकारण्यात येणार आहे. मात्र म्हाडा वसाहतीतील 80 टक्के इमारती 2000 चौ. मीटरच्या आतीलच असल्याने म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आता मार्गी लागणार असल्याची माहिती उपोषणकर्ते संजय कदम यांनी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या