हुश्श्य...चार वर्षांनंतर म्हाडाच्या ५४४६ घरांना मिळाली ओसी

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील ५४४६ घरांच्या लाॅटरीतील विजेते एक-दोन नव्हे, तर तब्बल चार वर्षे घरांच्या प्रतिक्षेत होते. विरारमधील म्हाडाच्या या घरांना वसई-विरार महापालिकेकडून ओसी मिळत नसल्यानं विजेत्यांचं गृहस्वप्न लांबलं होतं. आता मात्र या घरांना वसई-विरार महापालिकेकडून ओसी मिळाली आहे. त्यामुळे आता आठवड्याभरात विजेत्यांना देकार पत्र (letter of possession) पाठवत घराचा ताबा देण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली आहे.

ओसीमुळे ताटकळले विजेते

२०१४ मध्ये विरार-बोळींजमधील ४२७५ घरांसाठी तर २०१६ मध्ये ११७१ घरांसाठी कोकण मंडळाने लाॅटरी काढली होती. चालू बांधकाम प्रकल्पातील घरांसाठी ही लाॅटरी होती. त्यामुळे विजेत्यांना घरांचे काम पूर्ण होऊन ओसी मिळेपर्यंत वाट पाहणं अपरिहार्य होतं. 'लाॅटरी काढल्यानंतर दीड-दोन वर्षांत घराचा ताबा मिळेल', असा दावा कोकण मंडळाकडून केला जात होता. पण २०१८ उजाडलं, तरी या घरांना ओसी मिळाली नसल्यानं विजेत्यांचं घराचं स्वप्न लांबलं होत. ताबा मिळत नसल्यानं विजेत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.

अग्निशमन शिडी नव्हती म्हणून...

अखेर गेल्या आठवड्यात कोकण मंडळाला ओसी मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून हक्काच्या घरात राहायला जाण्याची वाट पाहाणाऱ्या विजेत्यांसाठी ही आनंदाची आणि दिलासादायक बाब ठरणार आहे. दरम्यान, २०१७ मध्येच २२ आणि २४ मजल्यांच्या इमारतीतील या ५४४६ घरांचं काम पूर्ण झालं होतं. पण वसई-विरार महानगरपालिकेकडे बहुमजली इमारतींसाठी आवश्यक असलेली अग्निशमन शिडी नसल्यानं ओसी मिळण्यात अडचण येत होती. त्यामुळे अशी शिडी उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. म्हाडानेच तशी मागणी पालिकेकडे केली होती.

म्हाडानेच दिले शिडीसाठी २० कोटी ४५ लाख

या मागणीनुसार पालिका, म्हाडा आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्यात झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार २० कोटी ४५ लाखांची शिडी खरेदी करण्यात आली आहे. या शिडीची रक्कम म्हाडाने पालिकेला अदा केली आहे. ओसी मिळण्यातील हा अडथळा दूर झाला आणि अखेर कोकण मंडळाला ओसी मिळाली.


हेही वाचा

म्हाडा लॉटरी २०१७ - विजेत्यांना आठवड्याभरात मिळणार सूचना पत्र

पुढील बातमी
इतर बातम्या