एमएमआरसीची शक्कल; डाँक्युमेन्ट्रीच्या माध्यमातून मेट्रो-3 बाबत करणार जनजागृती

'मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्याकरता' अशी हाक देत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गाचे काम हाती घेतले खरे. पण हा प्रकल्प हाती घेतल्यापासून या प्रकल्पावरून जो वाद सुरू झाला आहे, तो वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. इतकेच काय, तर हा वाद न्यायालयापर्यंत गेला आहे. प्रकल्पाला लागलेले हे वादाचे ग्रहण आणि प्रकल्पाला होणारा विरोध दूर करण्यासाठी आता एमएमआरसीने नामी शक्कल शोधून काढली आहे. ती म्हणजे डॉक्युमेन्ट्री फिल्मची.

मेट्रो-3 साठीच्या कारडेपोची उभारणी आरेमध्ये केली जाणार आहे. आरे हे मुंबईतील एकमेव मोठे वनक्षेत्र असून हे वनक्षेत्र मेट्रो-3 साठी नष्ट केल्यास त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होईल असे म्हणत पर्यावरणवाद्यांनी कारडेपोला विरोध करण्यास सुरूवात केली आणि येथून मेट्रो-3 ला वादाचे ग्रहण लागण्यास सुरूवात झाली. त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि मग वेगवेगळ्या कारणांवरून कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्गातील स्थानिकांकडूनही मेट्रोला विरोध  सुरू झाला.

या विरोधामुळे, उच्च न्यायालयाने रात्रीच्या वेळेस काम बंद केल्यामुळे मेट्रो-3 च्या कामावर परिणाम होत आहे. हा विरोध असाच सुरू राहिला, तर प्रकल्पास मोठा विलंबही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरसीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत मेट्रो-3 च्या माहितीसह मेट्रो-3 कशी गरजेची आहे? हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना काय आणि कसा फायदा होणार? आहे हे मांडण्यासाठी डॉक्युमेन्ट्री फिल्म बनवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

ही डॉक्युमेन्ट्री फिल्म बनवण्यासाठी एमएमआरसीने फिल्म निर्मिती आणि मल्टीमिडीया क्षेत्रातील कंपन्यांकडून गुरूवारी निविदा मागवल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या