अंधेरीतील पालिकेचे पम्पिंग स्टेशन हडपण्याचा 'एमएमआरडीए'चा डाव

दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मुंबई मेट्रो टप्पा 2 अ प्रकल्पांतर्गत अंधेरीतील महापालिकेच्या पम्पिंग स्टेशनसाठी आरक्षित जागेवर विद्युत उपकेंद्र (इलेक्ट्रिक सब स्टेशन) बांधण्यात येणार आहे. उपकेंद्राची ही जागा पुढील 30 वर्षांसाठी भाडेकरारावर देण्यात येणार आहे. मात्र ही जागा 'एमएमआरडीए'ने परस्पर लाटण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई मेट्रो टप्पा 3 अंतर्गत कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो मार्गासाठी महापालिकेचे 17 भूखंड 30 वर्षांसाठी भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहाने फेटाळून लावला होता. तरीही सरकारने या सर्व जागा परस्पर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मेट्रो 3 नंतर आता मुंबई मेट्रो टप्पा 2 अ च्या इलेक्ट्रिक सब स्टेशनकरता लागणारी अंधेरी पूर्व येथील पम्पिंग स्टेशनकरता आरक्षित 4000 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा देण्याची मागणी 'एमएमआरडीए'ने केली आहे.

मागील डिसेंबर महिन्यात या जागेची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे केल्यानंतर 'एमएमआरडीए'ने इलेक्ट्रिक सब स्टेशनसाठी या जागेची नितांत गरज असल्याचे कळवले आहे. या जागेवर असलेले आरक्षण बदलण्यासाठी राज्य सरकारची पूर्व मंजुरी 'एमएमआरडी'ने घेतलेली आहे. त्यामुळे जसा आहे, तसा हा भूखंड 'एमएमआरडीए'च्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले असून याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मंजुरीसाठी आल्यामुळे यावर सत्ताधारी पक्ष काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेट्रो टप्पा 3 प्रमाणे हा भूखंडही देण्यास विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या