MMRDA कडून कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो 14 प्रकल्पाला गती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) ने कांजूरमार्ग ते बदलापूरदरम्यान प्रस्तावित मेट्रो लाईन 14 प्रकल्पासाठी सुधारित डीपीआर (Detailed Project Report) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

एमएमआरडीएने MMRDA या मेट्रो मार्गासाठी सुधारित डीपीआर तयार करण्यासह प्रकल्पाची अंमलबजावणी रणनीती निश्चित करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा टेंडर जारी केला आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुधारित अहवालातून प्रकल्पाचे तांत्रिक नियोजन, आर्थिक मॉडेल आणि बांधकामाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीपीआर सल्लागारासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. सल्लागाराची अंतिम निवड आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक मंजुरी प्रक्रिया आणि पुढील बांधकाम टेंडर जारी करण्यात येणार आहेत.

मेट्रो लाईन 14 हा मुंबईला थेट बदलापूरशी जोडणारा महत्त्वाचा उपनगरीय कॉरिडॉर मानला जात आहे. हा मार्ग का़ंजूरमार्ग (Kanjurmarg) ते बदलापूर (Badlapur) दरम्यान असून तो ठाणे जिल्ह्यातून जाणार आहे.

प्रस्तावित मार्ग सुमारे 39 ते 45 किलोमीटर लांबीचा असून त्यात अंदाजे 15 स्थानकांचा समावेश असेल. या कॉरिडॉरमध्ये उड्डाणपूल आणि भूमिगत अशा दोन्ही प्रकारच्या मेट्रो मार्गांचा समावेश असेल. काही भाग पारसिक टेकडी आणि ठाणे खाडी परिसरातून जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

या मेट्रोमुळे कांजूरमार्ग ते बदलापूर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

तसेच मुंबईच्या पूर्व उपनगरांमधील आणि विस्तारित मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना अधिक वेगवान व सुलभ कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे 18 हजार कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

MMRDA अधिकाऱ्यांच्या मते, सुधारित डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणी सुरू होईल.

मात्र, या मेट्रो मार्गाचे बांधकाम सुरू होऊन पूर्णत्वास जाण्यास अजून काही वर्षांचा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, अनेक वर्षे रखडलेल्या वसई-भाईंदर डबल डेकर पुल प्रकल्पालाही गती मिळत असून, या पुलामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या 10 मिनिटांवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा

CSMT स्थानकाचा 2450 कोटींचा पुनर्विकास होणार

पुढील बातमी
इतर बातम्या