मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता अदानी समूहाकडे

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आता पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे.

विमानतळाच्या व्यवस्थापनाचे पूर्ण नियंत्रण अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे (एएएचएल) देण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने याआधीच घेतला आङे. आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाणार आहे. 

मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. विविध पातळ्यांवरील न्यायिक प्रकरणांनंतर अखेर हे विमानतळ खरेदी करण्याला अदानी समूहाला हिरवा कंदीला मिळाला. मागीलवर्षी ही खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. 

देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेला आहे. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते. त्यानंतर आता मुंबई हे अदानी समूहाच्या अखत्यारित असलेले चौथे विमानतळ आहे. यानंतर जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळेही अदानी समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे बोलले जात आहे.ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील.

पुढील बातमी
इतर बातम्या