मुंबई-गोवा हाय-वे 2019 पर्यंत पूर्ण करणार - चंद्रकांत पाटील

मुंबई ते गोवा प्रवास सुलभ, सुकर आणि जलद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात येणारा मुंबई-गोवा हाय-वे प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पासाठीचा विस्तृत आराखडा तयार झाला आहे. तर चार मार्गिकेच्या या प्रकल्पासाठी मे महिन्यात निविदा मागवण्यात येतील आणि त्यानंतर हाय-वेच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. त्यानुसार दोन वर्षात काम पूर्ण करण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई-गोवा हाय-वे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यास मुंबई-गोवा प्रवास सुकर होणार असल्याने ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

रायगड ते महाड असा स्वतंत्र हाय-वे बांधण्याचाही प्रस्ताव असून त्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध होणार आहे. तर या हाय-वेसाठी अंदाजे 250 कोटी खर्च अपेक्षित असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. तर महाड येथील कोसळलेल्या सावित्री पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली असून हा पूल आता उद्धाटनासाठी सज्ज झाला आहे. 27 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या पुलावर शेवटचा हात फिरवला जात असून 5 जून रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी जाहीर केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. सावित्री पूल ऑगस्ट 2016 मध्ये कोसळला होता आणि यात 30 जणांचा जीव गेला होता तर 10 जण बेपत्ता झाले होते. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. हा पूल सुरू झाल्याने मुंबईकरांचा कोकण प्रवास सुकर होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या