मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास सुस्साट, तासाचा प्रवास फक्त २० मिनिटांवर

(Image: Twitter/Eknath Shinde)
(Image: Twitter/Eknath Shinde)

देशातील सर्वात लांब समुद्री पूल मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर फक्त २० मिनिटांत पार करता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच ओपन डेक बसमधून, मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरुन (एमटीएचएल) प्रवास केला आहे. हा ट्रान्स हार्बर सी लिंक २२ किलोमीटर इतका लांब आहे. २२ किमीच्या या शेवटच्या डेकचं, ज्याला गोल्डन डेक असं म्हटलं जातं, ते काम पूर्ण झालं असून समुद्रावर पॅकेज १ आणि पॅकेज २ जोडण्यात आलं आहे. हा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक जवळपास १८ किमी समुद्रातून असून इतर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे.

मुंबईतील शिवडीतून नवी मुंबई २० मिनिटांच्या अंतरावर येईल. शिवाय मुंबई-पुणे हायवेला हा मार्ग पुढे जोडला जात असल्यामुळे मुंबई-पुणे अंतरही कमी होणार आहे.

पुढे हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक ५४ लाही जोडला जाणार आहे. हा मार्ग नोव्हेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

ट्रान्स हार्बर सी लिंकच्या उजव्या बाजूवरील शिवडी ते चिर्लेपर्यंतच काम पूर्ण झालं आहे. मात्र वॉटरप्रुफिंग, सिमेंट आणि क्रॅश बॅरिअर्स टाकणं अशी इतर कामं सुरू आहेत.

१०.३८ किमीच्या पॅकेज १ चं काम एल अँड टी-आयएचआयकडून केलं जात आहे. या टप्प्यावर दक्षिण मुंबईतील शिवडीजवळ इंटरचेंज असेल. तर ७.८ किमीच्या पॅकेज २ मध्ये शिवाजी नगरजवळ इंटरचेंज असून यामुळे नवी मुंबईतील जेएनपीटी, उलवे आणि विमानतळ परिसर जोडला जाईल.

पॅकेज १ आणि पॅकेज २ ही दोन्ही कामं समुद्रावर होत आहेत, तर ३.६ किमीचं पॅकेज ३ हे चिर्लेच्या बाजूने जमिनीवर होत आहे.

डाव्या बाजूने चिर्ले ते शिवडी या पॅकेज १ चे काम जूनच्या अखेरीस पूर्ण होणं अपेक्षित आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या