अखेर मुंबईतल्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

मुंबई - मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या तीन स्थानकांचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे अशा मुंबईतील दोन स्थानकांचा यात समावेश आहे. यासोबत पुणे स्थानकाचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. या तीन स्थानकांच्या पुनर्विकासाकरता निविदा पूर्व प्रक्रिया मध्य रेल्वेने सुरू केली आहे. पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याचे काम आचारसंहितेमुळे करता येत नव्हते. मात्र आता निविदा पूर्व प्रक्रियेचे काम सोमवारपासून सुरु करण्यात आले आहे.

महसूल वाढीसाठी देशभरातील स्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यात मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांना स्थान मिळाले आहे. या स्थानकांच्या पुनर्विकासाचा खर्च हा प्रत्येकी 200 ते 250 कोटींच्या आसपास आहे.

पहिल्या टप्यात इच्छुक कंपन्यांची तांत्रिक पात्रता तपासली जाणार आहे. स्थानकाजवळील जमीन कंपनीला 45 वर्षांकरता भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसची जवळपास आठ एकर जमीन आहे. तर ठाणे स्थानकाजवळ 1.23 एकर जमीन व्यवसाय वापरासाठी उपलब्ध असल्याचे रेल्वे जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांनी सांगितले. तसेच या तिन्ही रेल्वे स्थानकावर सर्व सुविधा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत. स्थानकावरील स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या