आमची घरं इथे..आणि पुनर्वसन इतक्या लांब का?

गोरेगाव - पालिकेच्या पी दक्षिण विभागाच्या कार्यालयावर गोरेगाव (प.) इथल्या भगतसिंगनगर आणि लक्ष्मीनगरमधील रहिवाशांनी मोर्चा काढला. या परिसरात नाला रुंदीकरणासाठी पालिकेने तेथील पाच हजार रहिवाशांना नोटीस देऊन त्यांची लॉटरी काढून चेंबूर आणि वाशी येथे घरे देण्याचे ठरवले होते.

मात्र सध्या राहात असलेल्या ठिकाणीच आपलं पुनर्वसन व्हावं. या मागणीसाठी तेथील नागरिकांनी गुरुवारी मोर्चा काढला. या वेळी भगतसिंगनगरचे रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे, राजू पाध्ये आणि प्रमिला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यासोबत बैठक घेऊन सदर लॉटरीसंबंधी जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत लॉटरीला स्थगिती देण्यात यावी, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिकेला देण्यात आले. तसेच या रहिवाशांचा नाला रुंदीकरणाला विरोध नाही, पण तिथल्या झोपडीधारकांना गोरेगाव-दहिसरमध्येच घरे देण्यात यावीत. तसेच पात्र किंवा अपात्र काहीही न पाहता जेवढे झोपडीधारक आहेत त्या सर्वांना घरे देण्यात यावीत. शिवसेना कोणालाही बेघर होऊ देणार नाही, असे आश्वासन माजी नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी दिलं. तर पालिका आयुक्त आणि महापैार यांच्या निर्णयानंतरच काय तो निकाल लावू असे पालिका अभियंता अमित पाटील यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या