समृद्धी महामार्ग: नागपूर-शिर्डी प्रवासात ९०० रुपये टोल

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी अशा ५२० किमीच्या टप्प्यावरून पाच तासात प्रवास करण्यासाठी वाहनचालक/प्रवाशांना ९०० रुपये इतका टोल भरावा लागणार आहे. जितका प्रवास तितका टोल या तत्त्वावर टोलवसुली करण्यात येणार आहे. त्यानुसार ५२० किमीच्या मार्गात १९ टोल नाके कार्यान्वित करण्यात आले असून हे टोलनाके १९ एक्झिट पॉइंटवर आहेत.

मुंबई ते नागपूर अशा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू आहे. हा महामार्ग पूर्ण करण्यात विलंब झाला आहे. त्यामुळे जितका मार्ग पूर्ण झाला आहे तितका मार्ग टप्प्याटप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.

त्यानुसार याआधी नागपूर ते सेलू बाजार असा २१० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र हे लोकार्पण बांधकामाधीन पूल कोसळल्याने रद्द करण्यात आले. यानंतरही लोकार्पणासाठी अनेक मुहूर्त जाहीर झाले, मात्र लोकार्पण काही झाले नाही. पण आता मात्र समृद्धीच्या लोकार्पणासाठी ११ डिसेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या