मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) चेंबूरजवळील चेडा नगरपासून ठाण्यातील आनंद नगरपर्यंत नव्या उड्डाणपुलाच्या बांधकामास सुरुवात केली आहे. तब्बल 2,682 कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार आहे. दक्षिण मुंबई ते ठाणे दरम्यान प्रवास सिग्नलशिवाय आणि सुलभ होणार आहे.
हा कॉरिडॉर घाटकोपरमधील चेडा नगरजवळून सुरू होईल, जिथे सध्या ईस्टर्न फ्रीवे मानखुर्दपर्यंत संपतो. याच फ्रीवेचा थेट विस्तार केला जाईल. हा मार्ग रामाबाई नगर, विक्रोळी, कांजूरमार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR), ऐरोली, मुलुंड आणि घाटकोपर या भागांना जोडेल. अखेरीस ठाण्यातील आनंद नगर येथे समाप्त होईल.
तसेच, आनंद नगर ते साकेत (मुलुंड चेक नाका) दरम्यान प्रस्तावित दुसऱ्या उड्डाणमार्गाशीही हा कॉरिडॉर जोडला जाईल.
हा 13.90 किलोमीटर लांबीचा आणि 25 मीटर रुंदीचा सहा-लेनचा उड्डाणमार्ग असेल, ज्यात प्रत्येकी तीन लेन दोन्ही बाजूंना असतील. प्रत्येक स्पॅन सुमारे 40 मीटर लांबीचा असेल.
तसेच, दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेनचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे रॅम्प्स बांधले जाणार आहेत. हे रॅम्प्स मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे असतील.
सध्या MMRDAने टेस्ट पायलिंग आणि प्राथमिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. प्रकल्पासाठी मार्गातील सुमारे 700 झाडांवर परिणाम होणार असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांना तोडण्याचे नोटीस दिले आहेत.
तसेच, युटिलिटी आयडेंटिफिकेशन आणि भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी पिलर कास्टिंगचे कामही सुरू झाले असून सुमारे 5.38% बांधकाम पूर्ण झाले आहे.
अहवालानुसार, हा प्रकल्प “मुंबई इन मिनिट्स” (Mumbai in Minutes) या उपक्रमाचा भाग आहे. या उड्डाणमार्गावरून प्रवास केल्यास फक्त 20 ते 25 मिनिटांत ठाणे ते दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास शक्य होईल.
प्रकल्पाची एकूण कालमर्यादा चार वर्षांची असून त्यापैकी 36 महिने प्रत्यक्ष बांधकामासाठी आणि 12 महिने डिझाईन व पर्यावरणीय मंजुरीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा