'हर घर शौचालय'वर हातोडा

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

अँटॉप हिल - महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जात आहे. पण भारत सरकारची 'हर घर शौचालय' ही योजना पालिकेच्या पचनी न पडल्याचे चित्र अँटॉप हिलच्या चांदणी आगार इथे निर्माण झाले आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या 16 वर्ष जुन्या उज्ज्वल शौचालयावर बुधवारी पालिकेच्या एफ - उत्तर विभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली.

या परिसरात 12 हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. स्थानिकांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता तोडक कारवाई करण्यात आल्याने रहिवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सिम इंडिया या नाल्याच्या विस्तारीकरणाचे कारण पुढे करत केवळ 48 तासांची नोटीस बजावून त्या आधीच या शौचालयावर बुलडोझर फिरवण्यात आल्याचे शौचालयाचे देखरेखदार क्लीन सिटी काउंसिल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वीरपाल जे. वाल्मिकी यांनी सांगितले. मनपाच्या या कारवाईविरोधात सिटी काउंसिल संस्थेच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहितीही वाल्मिकी यांनी दिली. याबाबत महापालिका एफ उत्तर विभागाचे सहायक अभियंता राजेश मीराई यांच्याशी चर्चा केली असता सदर ठिकाणी असलेल्या सिम इंडिया नाल्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या शौचालयामुळे कामात अडथळा निर्माण होत असल्याने हे शौचालय तोडण्यात आले. सध्या येथील नागरिकांच्या सोयीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागकडून तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या