मुंबई MMR मध्ये आणखी दोन रिंग रोड बांधण्याचा प्रस्ताव

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी MMRDA ने आणखी दोन रिंग रोड प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे MMR मधील प्रस्तावित रिंग रोडचं नेटवर्क आता 7 वरून 9 रिंग रोडपर्यंत वाढणार आहे.

या नव्या दोन रिंग रोडची एकूण लांबी तब्बल 307 किलोमीटर असेल. विशेष म्हणजे, या संपूर्ण मार्गावर नव्याने रस्ते बांधले जाणार नाहीत. त्याऐवजी अस्तित्वात असलेले रस्ते, सुरू असलेले आणि प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्प एकमेकांना जोडून सलग रिंग तयार केली जाणार आहे.

आठवा रिंग रोड 197 किमी, तर नववा रिंग रोड 110 किमी लांबीचा असेल.

आठवा रिंग रोड कसा असेल?

आठव्या रिंग रोडची सुरुवात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (MTHL) सेवरी टोकापासून होईल. पुढे ईस्टर्न फ्रीवे आणि ठाण्याकडे सुरू असलेल्या त्याच्या विस्ताराचा वापर केला जाईल.

त्यानंतर मार्ग आनंद नगर–साकेत एलिव्हेटेड रोडमार्गे पुढे जाईल. मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसवे आणि NH-4B च्या माध्यमातून हा मार्ग चिर्लेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर पुन्हा MTHL चा वापर करून सेवरीला परत येत हा रिंग पूर्ण होईल.

यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडी यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. JNPT परिसर, महत्त्वाची मालवाहतूक केंद्रं आणि ठाण्यातील अमणे यांसारख्या विकसित होत असलेल्या भागांनाही याचा फायदा होणार आहे.

नववा रिंग रोड मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरून

नववा रिंग रोड नरीमन पॉइंटपासून सुरू होईल. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यालगत उत्तर दिशेने जाताना कोस्टल रोड, बांद्रा-वर्ली सी लिंक, वर्सोवा-बांद्रा सी लिंक आणि उत्तरेकडील कोस्टल रोड वापरला जाईल.

हा मार्ग बोरिवलीपर्यंत गेल्यानंतर ठाणे-बोरिवली ट्विन टनेलमधून ठाण्यात प्रवेश करेल.

पुढे ठाणे कोस्टल रोड-1, आनंद नगर–साकेत एलिव्हेटेड रोड, ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार आणि ईस्टर्न फ्रीवे यांच्या माध्यमातून मार्ग दक्षिणेकडे येईल. त्यानंतर प्रस्तावित ऑरेंज गेट टनेलमार्गे नरीमन पॉइंटशी पुन्हा जोडला जाईल.

80 किमी प्रतितास वेग; काही भाग टोलचा

दोन्ही रिंग रोड Access-Controlled Corridors असतील आणि त्यांची डिझाइन स्पीड 80 किमी प्रतितास ठेवण्यात आली आहे.

प्रवेश आणि बाहेर पडण्याचे पॉइंट मर्यादित असतील. तसेच काही भागांमध्ये टोल आकारला जाण्याची शक्यता आहे.

मात्र, हे दोन्ही रिंग रोड लगेच सलग उपलब्ध होणार नाहीत. कारण या मार्गाचा भाग असलेले अनेक प्रकल्प अद्याप बांधकामाधीन किंवा नियोजनाच्या टप्प्यात आहेत.

MMRDA चं लक्ष्य हे दोन्ही रिंग रोड 2029 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचं आहे.

MMRDA महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांच्या मते, मुंबई आणि MMR मधील प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्प स्वतंत्रपणे पाहण्याऐवजी संपूर्ण प्रदेशाला एकात्मिक रस्ते नेटवर्क म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा बदल आहे.

MMRDA, BMC, MSRDC आणि NHAI यांच्या अखत्यारीतील विविध प्रकल्प या नेटवर्कचा भाग असतील.

या रिंग रोडचा मुख्य उद्देश म्हणजे मुंबईतील अंतर्गत आणि गर्दीच्या रस्त्यांवरील लांब पल्ल्याची वाहतूक बाहेर वळवणे आणि मुंबई तसेच संपूर्ण MMR भोवती पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे.


हेही वाचा

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर हलणार?

पुढील बातमी
इतर बातम्या