महालक्ष्मी मेट्रो स्थानकाच्या भूयारीकरणाचा टप्पा पूर्ण

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. सायन्स म्युझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक दरम्यानचे १११७.५ मीटरचे भुयारीकरण २५७ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. 

रॉबिन्स बनावटीच्या टनेल बोरिंग मशीन तानसा-२ द्वारे भुयारीकरणाचा टप्पा एकूण ७४५ रिंग्सच्या साहाय्याने पूर्ण करण्यात आला. सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी स्थानक दरम्यान भुयारीकरण आव्हानात्मक होते. या टप्प्यातील भुयारीकरण ८० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींच्या आणि पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकांच्या दरम्यान थेट रेल्वेमार्गाच्या खालून करण्यात आले आहे. 

मेट्रो-३ मार्गिकेतील पॅकेज-३ मध्ये पाच स्थानके असून हा या मार्गिकेतील सर्वात लांब टप्पा आहे. या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्यूझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. 

३३.५ कि.मी.च्या लांबीच्या मेट्रो ३ मार्गात येण्या-जाण्यासाठी अंदाजे ५५ कि.मी.चे भुयारीकरण करण्यात येत आहे. अत्याधुनिक टीबीएम मशीनद्वारे हे काम करण्यात येत आहे. ३३.५ कि.मी.च्या मार्गात भूगर्भात १७ टीबीएम सोडण्यात आल्या आहेत. या टीबीएम मशीन आपले काम पूर्ण करत बाहेर येत आहेत.

आतापर्यंत तीन भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५२.६ किमी म्हणजेच ९६.५ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या