वरळी बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी म्हाडातर्फे बुधवारी २६ रोजी होणाऱ्या घरांच्या सोडतीला विरोध दर्शविला होता. त्यानंतर म्हाडाने तांत्रिक सबब सांगत सदर सोडतीची तारीख पुढे ढकलली आहे.
आता बुधवार रोजी होणारी सोडत ही पुढील आठवड्यात म्हणजेच,गुरुवार ४ मे, रोजी होणार आहे. रहिवाश्यांच्या मागणीनुसार वरळी बीडीडी चाळी पुनर्विकास प्रकल्प सादरीकरणही करणार आहे.
प्रकल्पाच्या आराखड्याबाबत रहिवाश्यांमध्ये संभ्रम असून त्यांच्यासमोर पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण करावे अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याचसोबत, मंगळवारी ता. २५ रोजी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह बीडीडी चाळ रहिवाश्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी बीडीडी चाळ क्रमांक १०४, १०८ आणि १०९ मधील रहिवाश्यांनी बुधवार रोजी होणारी सोडत रद्द करावी, अशी मागणी केली होती.
तसेच, बीडीडीचाळ पुनर्विकास प्रकल्प आणि रहिवाश्याना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, मागण्यांबाबतही माहीती मिळावी, असेही रहिवाश्यांची मागणी आहे. त्याच्या या मागणीला यश आले आहे.
मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सदर सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ही सोडत दि. ०४/०५/२०२३ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाने राहिवाश्याना दिली आहे.