राष्ट्रीय कबड्डीत महाराष्ट्राच्या पुरुषांची अंतिम फेरीत धडक

हैदराबादच्या गचीबाऊली स्टेडियमवर सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली अाहे. महाराष्ट्राने अखेरच्या क्षणी कर्नाटकवर ३५-३४ असा थरारक विजय मिळवून विजेतेपदाच्या दिशेने कूच केली अाहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या या विजयात मुंबई उपनगरचा खेळाडू रिशांक देवाडिगाने चमकदार कामगिरीची नोंद केली अाहे. या विजयामुळे महाराष्ट्राला अाता १० वर्षांनंतर विजेतेपदाची संधी प्राप्त झाली अाहे. महाराष्ट्राची अंतिम लढत गतविजेत्या सेनादलाशी होईल. सेनादलाने हरियाणाला ३२-२८ असे पराभूत केले.

मध्यंतराला महाराष्ट्राकडे मजबूत अाघाडी

उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने सुरुवात आक्रमक केल्यामुळे पूर्वार्धात २२-११ अशी भक्कम आघाडी घेतली होती. उत्तरार्धात कर्नाटकने लोणची परतफेड करीत आघाडी कमी केली. त्यानंतर कर्नाटकने ३४-३२ अशी अाघाडी घेतली. महाराष्ट्राचे गिरीश इरनाक, नितीन मदने व ऋतुराज कोरवी हे तीन खेळाडू मैदानात असताना गिरीशने अव्वल पकड करत दोन गुण मिळवले अाणि रिशांकला जीवदान देत ३४-३४ अशी बरोबरी साधून दिली. अखेरच्या क्षणी रिशांकने मिळवलेला एक गुण महाराष्ट्राला अंतिम फेरीत पोहोचवण्यात निर्णायक ठरला.

रिशांकने मिळवले १३ गुण

रिशांकने आपल्या २० चढायांमध्ये १३ गुण मिळविले तर ३ वेळा त्याची पकड झाली. गिरीश इरनाकने ४ यशस्वी पकडी केल्या. विराज लांडगेने ३ यशस्वी पकडी केल्या. कर्नाटककडून प्रभानजने छान खेळला.

महिलांमध्ये हिमाचल प्रदेश विजयी

हिमाचल प्रदेशने भारतीय रेल्वेची ३२ वर्षांची परंपरा मोडीत काढत महिला गटाचे अजिंक्यपद पटकावले. महिलांमध्ये हिमाचलने रेल्वेचा प्रतिकार ३८-२५ असा सहज मोडून काढत कबड्डीच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय विजेतेपदावर नाव कोरले.

पुढील बातमी
इतर बातम्या