महाराष्ट्रानं पटकावलं ११ वर्षानंतर राष्ट्रीय कबड्डीचं जेतेपद

२००७ मध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघानं अमरावतीमध्ये राष्ट्रीय विजेतेपदावर नाव कोरलं होतं. पण त्यासाठी महाराष्ट्राला पुढील जेतेपदासाठी तब्बल ११ वर्षे वाट पाहावी लागली. मुंबई उपनगरच्या रिशांक देवाडिगाकडे महाराष्ट्राच्या संघाची सूत्रे सोपवण्यात अाली अाणि अप्रतिम कामगिरीचा नजराणा पेश करत महाराष्ट्राच्या संघानं हैदराबादमध्ये थेट विजेतेपदाला गवसणी घातली. रिशांकच्या कल्पक नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं सेनादलाचा धुव्वा उडवत अानंदोत्सव साजरा केला अाणि अापल्या चाहत्यांना नववर्षाची अनोखी भेट दिली. महाराष्ट्राचं हे सातवं जेतेपद ठरलं.

दोन्ही संघांचा तोडीस तोड खेळ

रिशांकने अापल्या पल्लेदार चढायांच्या जोरावर सुरुवातीलाच तीन गुण घेत महाराष्ट्राला ३-० अशी अाघाडी मिळवून दिली. १४ व्या मिनिटाला महाराष्ट्रानं सेनादलावर लोण चढवत १३-४ अशी अाघाडी घेतली. मध्यंतराला १७-१२ अशी ४ गुणांची अाघाडी असताना महाराष्ट्राचा खेळ ढेपाळला. सेनादलाने २२-२२ अशी बरोबरी साधत २५-२३ अशी अाघाडीही घेतली.

तुषार पाटील ठरला टर्निंग पाॅइंट

शेवटची पाच मिनिटे असताना महाराष्ट्राची २८-२७ अशी स्थिती होती. तेव्हा प्रशिक्षक डाॅ. माणिक राठोड यांनी शेवटच्या क्षणी निलेश साळुंखेला बसवून तुषार पाटीलला संधी दिली. हाच महाराष्ट्रासाठी टर्निंग पाॅइंट ठरला. दोन वळा एकेक गुण मिळवून देत चढाईसाठी वेळही घेतला. सेनादलाचा मोनू गोयल वगळता एकही खेळाडू चमक दाखवू शकला नाही. प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली लागलेला नितीन तोमरही अपयशी ठरला.

रिशांक देवाडिगाचे १६ गुण

महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मुंबई उपनगरचा अाणि प्रो-कबड्डीतला स्टार खेळाडू. रिशांकने २ बोनस अाणि १४ झटापटीचे असे मिळून १६ गुण मिळवून महाराष्ट्राला जेतेपद मिळवून दिले. २ वेळा सुपर रेड टाकताना त्याची २ वेळा पकडही झाली. गिरीश इरनाकने ५ यशस्वी पकडी करत त्याला छान साथ दिली. अंतिम सामन्यात त्याने भक्कम बचाव केला, त्यामुळे नितीन तोमर, अजय कुमार यांना महाराष्ट्राचा बचाव भेदता अाला नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या