संकल्प प्रतिष्ठान, शिवसह्याद्री कव्हर्स विजयी

एकूण 105 गुणांची उधळण करीत रंगलेल्या सामन्यात संकल्प प्रतिष्ठान टायगर्स संघाने अपना बँक मास्टर्स संघाचा 5 गुणांनी पराभव केला आणि 'मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ' व 'आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी' आयोजित शालेय मुलांच्या पहिल्या 'मुंबई सुपर लीग कबड्डी' स्पर्धेची साखळी लढत जिंकली. संकल्प प्रतिष्ठान टायगर्स संघाच्या विजयात सामनावीर तेजस शिंदेसह साईल सारंग चढाईत चमकले. दुसऱ्या साखळी सामन्यातही एकूण 108 गुणांची नोंद झाली. या सामन्यात शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्स संघाने लक्ष्मी टूर मेकर्सवर 8 गुणांनी विजय मिळविला.

वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात सुरु असलेल्या 'मुंबई सुपर लीग कबड्डी' स्पर्धेमधील संकल्प प्रतिष्ठान टायगर्स विरुद्ध अपना बँक मास्टर्स यामधील लढत प्रेक्षणीय झाली.

चढाईपटू साईल सारंग व अष्टपैलू तेजस शिंदे यांच्या पहिल्या डावातील जोशपूर्ण खेळामुळे संकल्प प्रतिष्ठान टायगर्स संघाने 29-17 अशी आघाडी घेतली. अखेर हीच आघाडी संकल्प प्रतिष्ठान टायगर्सला संजीवनी देणारी ठरली. चढाईपटू स्वरूप जाधव, निखिल पिसाळ व वेदांत बेंडल यांनी दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारली आणि अपना बँक मास्टर्सला प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 7 गुण अधिक मिळवून दिले. परंतु मध्यंतराची पिछाडी त्यांना भारी पडल्यामुळे अखेर संकल्प प्रतिष्ठान टायगर्स विरुध्द 55-50 अशी हार पत्कारावी लागली.

तर, दुसऱ्या सामन्यात शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्सने लक्ष्मी टुर मेकर्स विरुद्ध पूर्वार्धात 29-22 अशी आघाडी घेतली आणि शेवटी 58-50 असा विजय संपादन केला. शिवसह्याद्रीचा सामनावीर गणेश शिंदे, चढाईपटू यश जिकमडे आणि लक्ष्मी मेकर्सचा चढाईपटू ओमकार पोखरकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.

यावेळी आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू राजू भावसार यांचा सत्कार करण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या