योनीच्या आकाराचा अॅश ट्रे अॅमेझॉनवर, ही विकृत मानसिकता आली कुठून?

हल्ली ऑनलाईन शॉपिंगची भलतीच क्रेझ आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये अॅमेझॉन ही चांगलीच लोकप्रिय साईट आहे. मला तशी काही फार ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वैगरे नाही. पण कधी तरी अॅमेझॉनवर फेरफटका असतो. त्या दिवशी सहज अॅमेझॉनवर नजर टाकली. मी जे पाहत होते, त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पाहून धक्काच बसला. एक अॅश-ट्रे पाहून प्रचंड चीड आली. तळपायाची आग मस्तकात गेली. तुम्ही म्हणाल एक अॅश-ट्रे पाहून मी एवढी का चिडतेय? मी काय, कुणीही तो अॅश-ट्रे पाहिला तर त्याला चीडच येईल. चक्क स्त्रीच्या योनीच्या आकाराचा अॅश-ट्रे.


अरे डोकं तर ठिकाणावर आहे या लोकांचं? अगदी काहीही विकतात?गेल्या आठवड्यात अॅमेझॉन या साईटवर योनीच्या आकाराचा अॅश-ट्रे विक्रीसाठी उपलब्ध होता. अॅमेझॉननं असं प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवलं म्हणून नेटिझन्सनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. नेटिझन्सचा विरोध पाहून तो अॅश-ट्रे विकणारी अॅड अॅमेझॉननं साईटवरुन काढून टाकली

कंपनीनं या उत्पादनाचं वर्णन काय केलं असेल? तर, 'ट्राईपोलर क्रिएटिव्ह इको-फ्रेंडली टेबलटॉप अॅश-ट्रे'. तुम्ही घरी किंवा बारमध्ये सजावटीसाठी याचा वापर करू शकता किंवा स्मोक करणाऱ्या पुरुषांना ही गोल्ड वुमन भेटवस्तू म्हणून देऊ शकता. स्त्रीच्या योनीमध्ये जळती सिगारेट विझवणे यात कसली आलीये क्रिएटिव्हिटी? योनीमध्ये जळती सिगारेट?...क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली तुम्ही काहीही बनवणार? ज्या कलाकारानं ही क्रिएटिव्हिटी दाखवली आहे त्याच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटतेय. कसली ही विकृत मानसिकता? हा प्रकार अमानवी तर आहेच, शिवाय एक प्रकारे ही बलात्कारी मानसिकताच आहे. अशी उत्पादनं बलात्कार करणाऱ्यांच्या मानसिकतेला खतपाणी घालण्याचं काम करतात. त्यामुळे अशा घटनांना किंवा शारीरीक आणि लैंगिक हिंसेला एक प्रकारे प्रोत्साहन देणंच झालं.  सिगारेट जाळण्यापेक्षा अशी मानसिकताच जाळून टाकणं गरजेचं आहे.

अॅमेझॉननं हे उत्पादन जरी साईटवरून काढून टाकलं असलं, तरी ही काही अॅमेझॉनची पहिलीच वेळ नाही ज्यामुळे अॅमेझॉनला नेटिझन्सच्या नाराजीचा सामना करावा लागला. यापूर्वीही अनेक वेळा अॅमेझॉनवर वादग्रस्त उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. त्यापैकीच एक होतं भाराताच्या तिरंग्यासारखं दिसणारं डोअरमॅट

यामुळे अॅमेझॉनवर नॅटिझन्सनी नाराजी व्यक्त केली होती. भारत सरकारनंही याचा निषेध केला होता आणि अॅमेझॉनला चांगलंच खडसावलं होतं. सुषमा स्वराज यांनी खडसावल्यानंतर कॅनेडा वेबसाईटवरून हे डोअरमॅट काढून टाकलं होतं. यावरून अॅमेझॉनला माफीही मागावी लागली होती.

एवढंच नाही, तर यापूर्वी अॅमेझॉनवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो असलेली चप्पलही विक्रीसाठी ठेवली होती. यावरुनही अॅमेझॉनवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर गांधीजींचा फोटो असलेली चप्पल काढून टाकण्यात आली. 

विवादास्पद उत्पादनं साईटवर ठेवून चर्चेत राहायचं ही अॅमेझॉनची जुनीच खोड आहे की काय असा प्रश्न पडतोय. असा वेबसाईट्सला आणि त्यांच्यावर विकण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या प्रॉडक्ट्सलाही आता मॉनिटरिंगची गरज आहे असं वाटू लागलंय. त्यावर त्वरीत निर्णय न घेतल्यास अजून काय काय पहावं लागू शकतं, याची कल्पना न केलेलीच बरी!

पुढील बातमी
इतर बातम्या