तुम्ही 'ब्लाईंड बुक डेट'वर कधी गेलात का?

खूप दिवसांपासून मी या दिवसाची वाट पाहत होते आणि अखेर तो दिवस उजाडला. पहिल्यांदाच मी काही तरी तुफानी करणार होते. तुफानी म्हणजे काय अगदी स्टंटबाजी वैगरे नाही! पहिल्यांदाच मी ब्लाईंड डेटवर जात होते. पण ब्लाईंड डेट कोणत्याही स्टंटबाजीपेक्षा कमी नाही. सो...ब्लाईंड डेट असली तरी मी खूपच एक्साईटेड होते. ऑफिस सुटल्यानंतर मला माझ्या ब्लाईंड डेटला भेटायला जायचे होते. त्यामुळे ऑफिसच्या कामात माझं लक्षच लागत नव्हतं. कधी एकदा ऑफिस सुटतंय आणि मी डेटवर जातेय असं झालं होतं. एकदाचे ६ वाजले. ऑफिस सुटलं. डेटला जायचं तर मग तयार तर झालंच पाहिजे. त्यामुळे तयार झाले आणि ऑफिसमधून निघाले. माझ्या डेटला भेटण्यासाठी ठाण्याच्या 'द वॉटर हाऊस डेली' या ठिकाणी जायचं होतं. ठरलेल्या वेळेच्या आधीच मी तिकडे पोहोचले. कॅफेत पाय ठेवला आणि पाहते तर समोर ६൦ च्या आसपास तरूण मंडळींचा घोळका! ओपन माईक सेशन सुरू होतं. समोरच असणाऱ्या स्टेजवर एक एक करून प्रत्येक जण येऊन वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते. एका मुलगा सुसाईड या विषयावर बोलत होता. कशा प्रकारे मी आठ जणांचे जीव वाचवले हे तो अभिमानानं सर्वांना सांगत होता. एका मुलीनं खूप सुंदर कविता सादर केली. शास्त्रीय गायक प्रणव केलकर यांच्या संगीतानं ओपन माईक सेशन कार्यक्रमाची सांगता करण्यात आला.

ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होती ती वेळ अखेर आली. माझी डेट माझ्या डोळ्यांसमोर होती. एका ब्राऊन कलरच्या कव्हरमध्ये बुक रॅप करण्यात आले होते. तुम्हाला वाटेल माझ्या डेटनं गिफ्ट वैगरे दिलं की काय? पण असं काहीही नाहीये. माझी डेट खरं तर आहे ती या पुस्तकांसोबत. हो तुम्ही बरोबर ऐकताय. पुस्तकांसोबत आहे माझी डेट. 'ब्लाईंड बुक डेट'. पुस्तक रॅप करण्यात आलेल्या ब्राऊन कवरवर ना लेखिकेचं नाव होतं, ना पुस्तकाचं. फक्त काही हिंट्स देण्यात आल्या होत्या आणि हिंट्स वाचूनच पुस्तकांची खरेदी केली जात होती. भन्नाट आइडिया आहे ना? ही आइडिया प्रत्यक्षात साकार करण्यामागे हात आहे तो 19 वर्षीय लक्ष्मी कृष्णन हिचा. लक्ष्मी ब्लाईंड बुक डेटची संस्थापक आहे.

ब्लाईंड बुक डेटची संकल्पना मला माझ्या कॉलेज कँटिनमध्ये चर्चा करताना आली. आपल्यापैकी बहुतेक जणांना ठरलेल्या लेखकांचे किंवा लेखिकांची पुस्तकं वाचायला आवडतात. बहुतेक वेळा आपले लेखक ठरलेले असतात. त्यांचीच पुस्तकं आपण वाचतो. पण असं न करता आपण वेगवेगळी पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. त्यामुळे ब्लाईंड बुक डेट या आयडियाचा जन्म झाला. मी आणि माझा मित्र आशय निगडेनं पुस्तकांना ब्राऊन कलरच्या पेपरमध्ये कव्हर केलं. त्यावर पुस्तकातील संबंधित काही स्टोरींचे हिंट्स दिले. जर कोणाला त्या पुस्तकात रुची असेल तर वाचक ती पुस्तकं खरेदी करतात. 

-लक्ष्मी कृष्णन, संस्थापक, ब्लाईंड बुक डेट

यासंदर्भात काही वाचकांशीही चर्चा केली. काहींना ब्लाईंड बुक डेट ही आयडिया खरंच आवडली. फक्त आवडलीच नाही तर त्यांनी पुस्तकंही खरेदी केली

ही खूप चांगली आयडिया आहे. तुम्ही अशी पुस्तकं खरेदी करता ज्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नसतं. एक अनोळखी पुस्तक ज्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नसतं आणि असं पुस्तक वाचायची मजा काही वेगळीच असते.

-स्वाती अय्यर, वाचक

कव्हर पेज ही पुस्तकांची कधीच ओळख होऊ शकत नाही. मी दुसऱ्यांदा ब्लाईंड बुक डेट या इव्हेंटला आले आहे. ओपन बुक डेट ही खूप चांगली संकल्पना आहे. पण बुक डेटिंग हा मुख्य अजेंडा असावा.

-वेदांती शुक्ला, वाचक

सर्वांशी बोलून झाल्यावर मी माझ्या डेटकडे वळले, म्हणजेच बुक डेटकडे! एका ब्राऊन कव्हरवर मला पुस्तकासंदर्भात मनोरंजक हिंट्स लिहलेल्या दिसल्या. मग काय बॉस, ही संकल्पना तर आवडलीच, पण मला हे पुस्तकही आवडलं. पुस्तक घेतलं आणि दोन दिवसात वाचूनही काढलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही. एका अनोळखी लेखिकेचं पुस्तक वाचण्याचा निर्णय रिस्की होता. पण पुस्तक वाचल्यावर हा अनुभव खूपच भारी वाटला. 

पुढील बातमी
इतर बातम्या