ट्रेनमधून प्रवास करताना भीती वाटते

सकाळी ९.५७ वाजता मस्जिद बंदवरून करिष्मानं कुर्ला लोकल पकडली. सकाळची वेळ होती. पण तरीही लेडिज कम्पार्टमेंटमध्ये गर्दी नव्हती. फक्त एकच महिला कम्पार्टमेंटमध्ये होती. भायखळ्याला ट्रेनमध्ये एक महिला चढली. तिच्यासोबत दोन पुरुषही चढले. त्या महिलेला कळालं की हे पुरुष दारू प्याले आहेत. तेव्हा ती लगेचच ट्रेनमधून उतरली. त्यामुळे ट्रेनमध्ये करिष्मा आणि आणखी एक महिला अशा दोघी होत्या. ते दोघं दारूडे करिष्माकडे बघत होते. करिष्मा खरच खूप घाबरली होती. पण हिम्मत करून करिष्मानं त्या दोघांचा फोटो आणि व्हीडिओ काढण्याचा प्रयत्न केला. पण तिचा प्रयत्न अपयशी ठरला. अखेर चिंचपोकळी स्टेशनवर ट्रेन थांबली आणि कंम्पार्टमेंटमध्ये काही बायका चढल्या. तेव्हा करिष्माच्या जीवात जीव आला. त्या महिलांनी अखेर दोघा दारूड्यांना हकललं. त्यानंतर करिष्मानं सुटकेचा श्वास सोडला. करिष्मा या सर्वांचा पहिल्यांदाच सामना करत होती असं नाही. याआधीही तिला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. दिवसा-ढवळ्या महिलांसोबत अशा घटना घडू शकतात. मग रात्रीचा विचारच न केलेला बरा. पण या घटनांमुळे करिष्माला ट्रेनमधून प्रवास करताना असुरक्षित वाटत आहे.

करिष्मासोबत घडलेला प्रकार मी सेंट्रल रेल्वेच्या पीआरओच्या कानावर घातला. पण सकाळच्या वेळी आम्ही ट्रेनमध्ये पोलीस जवान तैनात करत नसल्याचं पीआरओनं सांगितलं. पण अशी परिस्थिती उद्भवली की, तुम्ही १८२ या हेल्पलाईनवर कॉल करू शकता, असं पीआरओ यांनी स्पष्ट केलं.

फक्त करिष्माच नाही तर मला सुद्धा रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करायला भीती वाटते. मला आजही आठवतंय. मी आणि माझी मैत्रीण रात्री ऑफिसवरून घरी जात होतो. १൦ च्या आसपास एलफिस्टनवरून आम्ही बोरिवली लोकल पकडली. लोकलमध्ये एक गर्दुला बसला होता. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सीटवर जाऊन बसलो. आमचं लक्ष नव्हतं तो अचानक आला आणि माझी बॅग घेऊन पळू लागला. तेवढ्यात ट्रेन सुरु झाली. पण ट्रेननं अजून प्लॅटफॉर्म सोडला नव्हता. त्याचाच फायदा घेऊन त्यानं चालू ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडायला गेली असता मला दुखापत झाली. आम्ही चोर-चोर ओरडो लागलो तेव्हा तो घाबरला आणि बॅग कम्पार्टमेंटमध्येच टाकून चालू ट्रेनमधून उतरला. खरच भयंकर अनुभव होता तो. त्यानंतर मात्र आम्ही सावध झालो. लेडिज कम्पार्टमेंटमध्ये कुणी गर्दुला किंवा दारूडा दिसला की, त्याला आम्ही खाली उतरवतो. पण तरीही मनात असुरक्षेची भावना कुठे ना कुठे घर करून आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पण कधी-कधी पोलीसही दिसत नाहीत. त्यामुळे महिलांना रात्रीच्या वेळी जाणं असुरक्षित वाटतं.

"२൦१५ साली ही घटना माझ्यासोबत घडली होती. मी माज्या ग्रुपसोबत ट्रेकिंगवरून येत होतो. आम्ही सर्वच खूप थकलो होतो. आसनगाववरून आम्ही लोकल पकडली. जनरल कमपार्टमेंटमध्ये असल्यानं खूप गर्दी होती. पण लकिली मला बसायला मिळालं. गाटकोपरला उतरायचं म्हणून मी ठाणे गेल्यानंतर मी जागेवरून उठली आणि पुढे येऊ लागले. तर गर्दीचा फायदा घेत एक माणूस मला हात लावायला लागला. एकदा झालं. पण दुसऱ्यांदाही त्याचा हात लागला. मग शेवटी मी त्याला याचा जाब विचारला? त्याला त्याच वेळी झाडलं."

-पल्लवी धनावडे

हे अनुभव वाचल्यावर तुम्ही म्हणाल, "रात्री कोणी सांगितलं, लेडिज कमपार्टमेंटमध्ये प्रावस करायला? मुकाट्यानं जनरल कम्पार्टमेंटमधून प्रवास करावा." पण जनरल कम्पार्टमध्येही काही वेगळी परिस्थिती नसते. जनरल कम्पार्टमेंटमध्ये तर एखादी महिला चढली की, प्रत्येकाच्या नजरा त्या महिलेवर असतात. कुणी तिच्या छातीकडे बघते तर कुणी तिच्या चेहऱ्याकडे. कपडे ऐसा पेहनते है तो देखेंगेही, अशी कमेंटही काही महाशय करतात. अरे बुरखा घातलेल्या महिलेकडे ही अशाच नजरेनं पाहिलं जातं. आता काय बोलायचं अशा महाशयांना? अशा लोकांचे विचार दोन पायांमध्येच असातात.

महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहेत. पण लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायचा म्हटलं की, महिलांना असुरक्षित वाटतं. महिला एकच्या प्रवास का नाही करू शकत? कुठेही प्रवास करताना अवती-भवती असणाऱ्या महिलांवर का अवलंबून राहावं लागतं? ट्रेनमधून प्रवास करायला का आपल्याला वेळेपासून ते कपड्यांपर्यंत सर्वांचा विचार करावा लागतो? असे अनेक प्रश्न पडतात. म्हणून आता महिलांनी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी स्वत: घेणे आवश्यक तर आहेच आणि शिवाय गरजेचं आहे. तसं तर महिला सर्वच जबाबदाऱ्या पार पाडतात. आता आणखी एक जबाबदारी असेल आणि ती म्हणजे स्वत:च्या रक्षणाची. अशा आंबट-शौकिन प्रवाशांना अद्दल घडवायलाच हवी.

पुढील बातमी
इतर बातम्या