उन्हाळ्यात अंगाला खाज उठते? या ७ घरगुती उपायांनी करा समस्या दूर

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हात अंगाची अक्षरश: लाहीलाही होते. घामामुळे अंग नुसतं चिपचिपित होतं. अशावेळी शरीराला खाज सुटते. खाजवून खाजवून अंगावर चट्टे उठतात. अतिप्रमाणात खाजवल्यानं त्वचेला हानी पोहचू शकते. यापासून बचाव करण्यासाठी आम्ही तुम्हाला घरच्या घरी काही उपाय सांगणार आहोत.

१) त्वचा संवेदनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त आहे. पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते. त्यामुळे शरीराची खाज कमी होण्यास मदत होते.

२) कधी त्वचेच्या शुष्कतेमुळे शरीराला खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर कोमट पाण्यानं आंघोळ करा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला खोबरेल तेल लावा.

३) ‘व्हिटामिन सी’ने युक्त लिंबात ब्लिचिंग क्षमतादेखील असल्यानं त्वचेची खाज कमी होण्यास मदत होते. तसंच लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्वचेच्या ज्या भागावर खाज सुटते तिथं लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. वाऱ्यावरच हे थेंब सुकू द्या. काहीवेळानं तुम्हाला त्रास कमी होत असल्याचं जाणवेल.

४) शरीराच्या लहानशा भागावर येणाऱ्या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा फारच उपयुक्त आहे. ३ भाग सोड्यात १ भाग पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट खाज येणाऱ्या भागावर लावा. मात्र त्वचेवर चिर गेली असल्यास किंवा जखम असल्यास हा उपाय करू नये. शरीरभर खाज सुटत असेल तर कपभर सोडा, कोमट पाण्यात टाकून आंघोळ करा.

५) तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर चोळा. पाण्यात काही तुळशीची पानं टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसाचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाज येत असलेल्या भागावर लावा.

६) कोरफडातील औषधी गुणधर्म त्वचेतील दमटपणा योग्य प्रमाणात राखण्यास आणि त्वचेला थंडावा देण्यास मदत करतात. कोरफडातील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटं तसंच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.

७) शरीराला येत असलेली खाज थांबविण्यासाठी मीठ, हळद आणि मेथी यांचं मिश्रण करा. तसंच हे मिश्रण आंघोळीपूर्वी अंगावर पाच मिनिटांपर्यंत लावावे. त्यानंतर पाच मिनिटांनी आंघोळ करावी.

आम्ही सांगितलेले उपाय करून पाहा. जर यामुळे देखील शरीराची खाज कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.


पुढील बातमी
इतर बातम्या