तिरंग्याबद्दल 'या' १४ गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हव्यात!

१५ ऑगस्ट २०१८ मध्ये भारताला स्वतंत्र होऊन ७२ वर्ष होतील. १५ ऑगस्टला आपण लहानपणापासून अगदी शाळेत असल्यापासून स्वातंत्र्य दिन करतो. आकाशात फडकणारा तिरंगा पाहून सर्वांचीच छाती अभिमानानं फुलून आली असेल. पण तुम्हाला माहीत आहे का? हा तिरंगा कधी आणि कसा संमत झाला? स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जाणून घेऊयात आपल्या तिरंग्याचा इतिहास...

१) २२ जुलै १९४७ रोजी म्हणजेच भारत देशाला स्वातंत्र मिळण्याच्या २४ दिवस आधी, घटना समितीच्या बैठकित तिरंगा ध्वज हा भारताचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.

२) तिरंगा बनवण्याचा मान जातो आंध्र प्रदेशच्या पिंगली वेंकैय्या या स्वातंत्र्य सेनानींना. राष्ट्रीय ध्वज निर्माण करणाऱ्या पिंगली यांचं निधन १९६३ साली झालं.

३) घटना बनण्याआधी राष्ट्रपतीपदच नसल्यानं पंतप्रधान हेच देशाचे प्रमुख होते. घटना निर्मितीनंतर राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख झाले. त्यामुळे स्वातंत्र दिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधानांकडून ध्वज फडकावला जातो. तर प्रजासत्ताक दिनाला राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकवला जातो.

४) कर्नाटकातल्या हुबळीमध्ये कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ या एकमेव परवानाप्राप्त संस्थेकडून तिरंगा बनवला जातो. इथूनच त्याचा पुरवठा केला जातो.

५) आपल्या देशात भारतीय ध्वज संहिता नावाचा कायदा आहे. जो तिरंगा फडकवण्याचे नियम निर्धारीत करतो. यानुसार एखाद्यानं चुकिच्या पद्धतीनं तिरंगा फडकावल्यास त्याला कारावास आणि दंडही होऊ शकतो.

६) तिरंगा नेहमी सुती, रेशमी किंवा खादीपासून बनलेला असावा. प्लास्टिकपासून ध्वज बनवण्यावर बंदी आहे.

७) त्याचप्रमाणे तिरंगा हा नेहमी ३:२ या गुणोत्तरात आयताकृती आकाराचा असला पाहिजे असा नियम आहे. तसंच अशोकचक्रात २४ आरे असणंही आवश्यक आहे.

८) ध्वजावर काहीही लिहिणं किंवा ध्वज एखाद्या वाहनाच्या मागे, बोटीवर, विमानात लावणं बेकायदेशीर आहे. याशिवाय ध्वजाचा जमिनीला स्पर्श होता कामा नये असाही नियम आहे.

९) इतर कोणत्याही ध्वजाला तुम्ही राष्ट्रीय ध्वजासोबत किंवा त्यापेक्षा उंट लावू शकत नाही. राष्ट्रीय ध्वजाचं स्थान हे सर्वोत्तम असतं. लोकांना

१०) घरात आणि कार्यालयात सामान्य दिवशी तिरंगा फडकवण्याची अनुमती २२ डिसेंबर २००२ नंतर देण्यात आली.

११) भारतातील सर्वात उंच तिरंगा हा ३६० फूट उंच आहे. अटारी म्हणजेच वाघा बॉर्डरवर हा झेंडा आहे. त्यानंतर कोल्हापूरात उभारण्यात आलेल्या ३०० फूट उंच तिरंग्याचा क्रमांक लागतो. भारतात संसद भवन हे एकमात्र भवन आहे जिथं एकाचवेळी ३ तिरंगे फडकावले जातात.

१२) २९ मे १९५३ मध्ये भारतीय तिरंगा नेपाळी ध्वजासोबत पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवर फडकावला होता. यादिवशी शेरपा तेनझिंग आणि एडमंड हिलरी या दोघांनी एव्हरेस्ट सर केला होता.

१३) देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या आणि देशातील महान व्यक्तींच्या पार्थिवावर तिरंगा लपेटला जातो. यावेळी केसरी पट्टी ही डोक्याकडे आणि हिरवी पट्टी ही पायांकडे ठेवली जाते. मृतदेहासोबत तिरंग्याला दहन किंवा दफन केलं जात नाही. तर गोपनीय पद्धतीनं त्याला जलसमाधी दिली जाते. फाटलेल्या, रंग गेलेल्या तिरंग्यालाही याच पद्धतीनं विसर्जित केलं जातं.

१४) भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झेंड्याची रचना ही वेगवेगळी होती. आजच्या रूपात पोहोचवण्यासाठी अनेक बदलांमधून भारतीय तिरंगा गेला आहे.


हेही वाचा-

'जन गण मन' च्या पिआनो व्हर्जनला ४ कोटी भारतीयांची पसंती


पुढील बातमी
इतर बातम्या