मायेची फुंकर घालणाऱ्या परिचारिकांना सलाम!

रुग्णांची सेवा कोण करतं? असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही पहिलं नाव घ्याल डॉक्टर. पण आणखी एक नाव तुम्ही विसरत आहात. आठवलं? डॉक्टर्ससोबत असणाऱ्या नर्स. रुग्णाच्या जखमेवर मायेची फुंकर मारणाऱ्या नर्स. ना वेळेची तमा ना स्वत:च्या दु:खांची. वैयक्तिक आयुष्यात कितीही दु:ख असोत, पण हॉस्पिटलमध्ये पाय ठेवताच स्वत:च्या दु:खांचा त्यांना जणू विसरच पडतो. नर्स या रुग्णांच्या जखमेवर उपचार करतात पण त्यांच्या जखमेवर कोण औषध लावणार?

रुग्णांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या या नर्सेसना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कमी पगार आणि त्यात जादा कामाचे तास. रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणारी वागणूक, दिवसपाळी त्यानंतर रात्रपाळी यामुळे त्यांचावर पडणारा ताण अशा अनेक समस्यांचा सामना नर्सेसना करावा लागतो. या परिस्थितीतही नर्सेस रुग्णांसाठी झटत असतात. खाजगी रुग्णालयांमध्ये किमान वेतन कायदा लागू नसल्यानं तुटपुंज्या पगारात काम करावं लागतं. सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे त्यांना भेडसावणारी नोकरीतील असुरक्षितता. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बहुतेक परिचारिका काम करत असतात. खास करून खाजगी रुग्णालयात. प्रत्येकालाच सरकारी रुग्णालयात नोकरी मिळेलच असे नसते.

रुग्णालयात जाताना घरचे टेन्शन मी घरीच सोडून यायचे. रुग्णालयाची पायरी चढली की मला फक्त पेशंट दिसायचे. माझं सर्व दु:ख विसरून फक्त पेशंट्सचीच सेवा करायचे आणि तेही प्रामाणिकपणे. तसं सरकारी नोकरी असल्यानं शिफ्टचा आणि पगाराचा कधी त्रास नाही झाला. पण सात तासाच्या ड्युटित काम खूप असतं. रुग्णालयात नर्सची संख्या कमी असल्यानं कामाचा खूप ताण पडायचा. २५-३० बेडमागे एक नर्स असायची. त्यामुळे प्रचंड काम असायचं. त्यामुळे सरकारनं नवीन भरती केली पाहिजे. जेणेकरून इतर नर्सेसवर अधिक ताण पडणार नाही आणि चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा करता येईल.

- मिनल वडके, नर्स

भारतात वाढत चाललेली लोकसंख्या, बदलती जीवशैली आणि त्यामुळे आजारांचे बदलते स्वरूप त्यामुळे रुग्णालये आणि त्यासोबतच नर्सेसची भेडसावणारी गरज अधिक आहे. पण सरकारी, खाजगी आणि नर्सिंग होम या सर्वच ठिकाणी नर्सेसची संख्या मागणीपेक्षा कमी आहे. भारतातील दुर्गम भागात तर नर्सेसची संख्या जास्त भेडसावते.

'द लेडी वुइथ द लॅप' म्हणून सन्मान मिळालेल्या जगातील पहिल्या नर्स फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा हा जन्मदिवस 'नर्सिंग डे' म्हणून साजरा होतो. त्यांचा मला अभिमान आहे. खरं पहायला गेलं तर नर्सिंगचा जॉब हा सोपा नाही. डोक्यात कितीही विचार चालू असोत पण तुम्हाला रुग्णांशी प्रेमानं बोलावं लागतं. दिवसा आमची ड्युटी ८ तास आणि रात्री १२ तास असते. पण या वेळेत आम्ही पेशंटसाठी अगदी जीव ओततो. त्यामुळे सरकारनं नर्सेसच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर न ठेवता त्यांना पर्मनंट केलं पाहिजे. जेणेकरून त्यांना नोकरीत सुरक्षित वाटेल.

- स्वाती भोसले, नर्स

आज जागतिक नर्स डे आहे. हा दिवस अनेक रुग्णालयांमध्ये साजरा करण्यात आला. हिंदुजा, केइएमा रुग्णालयातही नर्स डे साजरा करण्यात आला.

डॉक्टर्स एवढ्याच नर्सही वैद्यकीय सेवेचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्याशिवाय ही सेवा पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे सरकानं त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वत:चं दु:ख विसरून रूग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणाऱ्या या नर्सेसना 'मुंबई लाइव्ह'चा सलाम.


पुढील बातमी
इतर बातम्या