लेडी जमशेदजींमुळे माहिममध्ये टोलवसुली नाही

तुम्हाला मुंबईचा खरा इतिहास माहित आहे का? या प्रश्नाचे उत्तर बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच माहित असावे. तेही फारफार इतकेच की, मुंबईचे बेट पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांना लग्नात हुंडा म्हणून मिळाले. बस! फार तर गेट वे ऑफ इंडिया, काही ब्रिटिशकालीन इमारती, उंच गगनाला भिडणारे टॉवर्स ही ऐतिहासिक स्थळे म्हणजे मुंबई असाच समज झालेला असतो. पण मुंबईचा इतिहास याही पलीकडचा आहे. मुंबईतली अनेक ठिकाणे, रस्ते आजही इतिहासाच्या खाणाखुणा जपून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माहिममधील एल.जे.रोड

एल. जे. रोडचा इतिहास खूपच रंजक आहे. या मार्गावर प्रवासासाठी टोलवसुली प्रस्तावित होती. पण ब्रिटिशांचा हा बेत हाणून पाडला, लेडी जमशेदजी यांनी. लेडी जमशेदजी यांच्या योगदानाची दखल घेऊनच हा मार्ग बांधण्यात आला. या मार्गाला एल. जे. रोड हे नाव दिले गेले? काय आहे यामागचा इतिहास? मुंबई लाइव्हचा स्पेशल रिपोर्ट...    

एल.जे.रोड हे नाव कसे पडले?

लेडी जमशेदजींचे खरे नाव अवाबाई जमशेदजी जीजीभॉय असे होते. सामाजिक कार्यातले त्यांचे योगदान पाहता ब्रिटिश सरकारने त्यांना 'लेडी जमशेद' ही पदवी बहाल केली. लेडी जमशेद फार्मजी बाटलीवाला यांची मुलगी होती. ते पारसी समाजातील होते. मुंबईच्या फोर्ट किल्ल्यात लेडी जमशेदजींचे वडील बाटल्यांचा व्यापार करायचे. १० वर्षांच्या असताना अवाबाई यांनी चुलत भावाशी लग्न केले. त्यांच्या पतीचे नाव सर जमशेदजी जीजीभॉय होते. सर जमशेदजी जीजीभॉय १६ वर्षांचे असताना  त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. सर जमशेदजी आणि लेडी जमशेदजी यांना ७ मुलं आणि ३ मुली होत्या. त्यांपैकी त्यांच्या ४ मुलांचा आणि ३ मुलींचा प्लेगमुळे मृत्यू झाला.

एल.जे.रोड का बांधण्यात आला?

१८४५ पूर्वी माहिम आणि वांद्र्याला जोडणारा कोणताच मार्ग नव्हता. त्यामुळे लोकांना समुद्रमार्गे, बोटीने प्रवास करावा लागत असे. पण पावसाळ्यात समुद्रमार्गे जाणे धोकादायक झाले होते. बोट कलंडून अनेकांनी आपले जीव गमावले होते. त्यामुळे लेडी जमशेदजी यांनी माहिम आणि वांद्र्याला जोडणारा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लेडी जमशेदजी यांनी आर्थिक मदत केली. या आर्थिक मदतीच्या बदल्यात सरकारने या मार्गावर कधीच टोलवसुली करू नये, अशी अट ठेवली. सरकारने ती मान्य केली. त्यामुळेच आजपर्यंत एल. जे. मार्गावर टोलवसुली केली गेली नाही.

एल.जे.रोडवरील लँडमार्क

1) सेंट मायकल चर्च

2) माहिम दर्गा

३) शितलादेवी मंदिर

4) सिटीलाईट मार्केट

5) शिवसेना भवन, दादर

लेडी जमशेदजी यांनी केलेल्या समाज कार्याबद्दल एल. जे. रोडवर शिलालेख उभारण्यात आला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या