मन करा रे कणखर!

लॉकडाऊनमुळे जसा अनेक व्यवसायांवर परिणाम झाला तसाच तो खेळाडूंच्या नियमित सरावावरही झाला. ज्या खेळांमध्ये नियमित सराव आवश्यक होता, त्या सरावालाच खीळ बसली. त्याचा परिणाम खेळाडूंच्या शरीराप्रमाणेच मनावरही होऊ लागला आहे.

परंतु, अशा वेळी खचून न जाता, आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यावर मात करणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम मन कणखर केले पाहिजे आणि शारीरिक प्रशिक्षण कशा प्रकारे घेता येईल, याचाही विचार केला गेला पाहिजे.

यासंदर्भात क्रीडा मानसशास्त्रज्ञ अमृता कारखानीस देशमुख यांनी यासंदर्भातच माहिती दिली आहे. या कठिण परिस्थितीतही आपण अनेक समस्यांवर मात करू शकतो. फक्त आपलं मन कणखर असलं पाहिजे, हेच त्यांनी या लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

बऱ्याच खेळाडूंच्या क्रीडाप्रवासाला अचानक खीळ बसल्यानं त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर मर्यादा आली आहे. परिणामी, नुकसान, दुःख, निराशा, असहायता आणि अनिश्चिततेमुळे येणारी चिंतातुरता अशा मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

पण या नकारात्मक भावनांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होत आहे. मानसिक ताणामुळे नात्यांमध्ये समस्या निर्माण होणं किंवा कामाच्या ठिकाणी दिरंगाई होण्याचं प्रकार घडू लागले आहेत.

अशा परिस्थितीत आपले कुटुंबीय, टीममधील सहकाही, मित्र, प्रशिक्षक, शिक्षक आणि शाळेतील सल्लागार यांच्याकडून मदत घेतली पाहिजे. 

मानसिक ताणामुळे एका जागी बसून राहणे, अन्नावरील वासना उडणे, झोपेच्या वेळांमध्ये बदल झाल्यामुळे वजनाची समस्या निर्माण होणे इत्यादी आव्हाने निर्माण होत आहेत.

खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या वेळा बदलल्यानं  मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीनं या समस्या हाताळल्या पाहिजेत.

अशा सर्वांसाठी अमृता कारखानीस यांनी  एकच सल्ला दिला आहे तो म्हणजे, नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर एकाग्र व्हा, किंबहुना त्यांच्या खेळाशी संबंधित व्यायाम करा आणि जसं शक्य होईल, तसे प्रशिक्षण घेत राहा.

खेळाडू अत्यंत तंदुरुस्त समजले जातात. मैदानावर असताना त्यांच्या ताकदीचे, स्टॅमिनाचे आणि लवचिकतेचे प्रदर्शन घडवतात. कठीण परिस्थितीतही उच्च दर्जाची कामगिरी करतात आणि त्यांचा खेळ उंचावतात.

आपले शरीर आणि तंत्र यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ते प्रचंड व्यायाम आणि कष्ट घेतात. प्रत्येक खेळाची स्वतःची अशी एक गरज असते आणि त्यासाठी त्यांचे प्रशिक्षक त्यांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक ठरवत असतात. खेळाडू आणि त्यांचे पालक या वेळापत्रकाचं काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून खेळाडूंकडून उत्तम कामगिरी होऊ शकेल.

सखोल विचार करता जाणवते की, उत्तम कामगिरी होण्यासाठी मनाच्या कणखरपणाचीही तेवढीच आवश्यकता असते. ही बाजू समजून घेण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. काळानुसार प्रशिक्षक, पालक आणि खेळाडूंना ही दरी जाणवली आणि त्यांच्या स्पर्धात्मक प्रशिक्षणामध्ये मानसिक प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांना समजू लागले.

अलीकडील काळात क्रीडा मानसशास्त्राचे (स्पोर्ट सेटअपमध्ये मानसिक हस्तक्षेप करणारे स्पेशलायझेशन क्षेत्र) महत्त्व जाणवू लागले आहे आणि कामगिरी उंचावण्यासाठी पालक, प्रशिक्षक आणि खेळाडू प्रोफेशनल्सकडे जाऊ लागले आहेत.

“मला माझी कामगिरी पुढील टप्प्यावर कशी नेता येईल, सराव करताना माझी जशी कामगिरी होते तशी कामगिरी स्पर्धेत का होत नाही? स्पर्धेत मोक्याच्या क्षणी माझ्याकडून चुका का होतात आणि मला अचानक अडकायला का होत?” असे प्रश्न अनेकदा विचारले जातात.

सामन्यांमधील कसोटीच्या क्षणी मानसिक कणखरतेचे दर्शन घडवण्यासाठी मन आणि शरीरातील संबंध जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीला खेळाडू कामगिरी उंचावण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आणि विजेतेपद जिंकण्यासाठी येत होते. आता मात्र तरुण वयातच त्यांच्यात मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे आणि हे प्रमाण वाढतेच आहे. 

व्यायामाने मानसिक आरोग्य सकारात्मक होते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे, पण हे निरीक्षण उलट आहे. वाढलेली स्पर्धा, स्पर्धेचा ताण, अपेक्षांचे ओझे, आर्थिक विवंचना, लॉजिस्टिकच्या समस्या आणि पायाभूत सुविधांविषयी असलेली काळजी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान हे केवळ गुणवत्तेवर आधारीत नसतात तर हे घटक खेळाडूच्या नियंत्रणाबाहेर असतात.

चिंतातुरता, नैराश्य, व्यक्तिमत्वातील विस्कळीतपणा, स्वभागातील समस्या, भीती वाटणे, पीटीएसडी, खाण्यापिण्याच्या समस्या त्याचप्रमाणे गंभीर स्वरुपाच्या आरोग्यसमस्या वयाच्या १० व्या वर्षापासूनच दिसून येत आहेत. 

खेळामध्ये उत्तम कामगिरी करण्याची वर्षे आणि मानसिक आरोग्याच्या विविध प्रकारच्या समस्या एकाची वेळी होतात आणि त्यामुळे लक्ष देण्याची गरज असलेले, पण दुर्लक्ष झालेले हे मुद्दे समजून घेण्याची गरज अधिकच अधोरेखित होते.

कोणत्याही खेळाडूच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत प्रशिक्षण देणे, शारीरिक तंदुरुस्ती पुनःस्थापित करणे आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी ते तयार करणे यासाठी तत्परतेने मदत केली जाते पण मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्तीचे काय?  वेळ नसणे, स्रोतांची अनुपलब्धता, मदत कोणाकडून घ्यावी आणि किती काळापर्यंत घ्यावी हे मदत घेण्यातील काही अडथळे आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे मदत घेतल्यास समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असेही एक सामाजिक अवघडलेपण असते.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत ‘पुढे काय’ हा प्रश्न सतावत असेल आणि भविष्यातील परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे आणि सध्याच्या अनपेक्षित आव्हानाचा सामना कसा करायचा हे जाणून घेऊन मन, शरीर दोन्ही तंदुरुस्त ठेवायचे असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरू शकतं.


पुढील बातमी
इतर बातम्या