'राक्षस'चे पोस्टर वॉर!

'नवलखा आर्टस अॅँड होली बेसिल कम्बाइन'चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित तर समित कक्कड आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'राक्षस' हा शब्द उच्चारला तरी अंगावर काटा येतो. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. मात्र, आता या पोस्टरवरून नवा वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

सई ताम्हणकर आणि शरद केळकर ही नवीन जोडी प्रेक्षकांना ह्या चित्रपटात पहायला मिळणार आहे. आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी 'राक्षस' या चित्रपटाचे लेखन केले आहे. त्यांना आलेले अनुभव अतिशय सुंदरपणे त्यांनी या चित्रपटात मांडले आहेत. तर 'आयना का बायना', 'हाफ तिकीट' या चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड यांनी 'राक्षस' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'आयना का बायना' हा सोनी मॅक्सवरील पहिला हिंदी डब चित्रपट आहे.

'राक्षस' चित्रपटात ऋतुजा देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, पंकज साठे, सविता प्रभूणे, अभिजीत झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर हे कलाकार आहेत.

पोस्टरवरून झाला वाद

'राक्षस' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर नवा पोस्टरवाद निर्माण झाला आहे. पोस्टर प्रदर्शित होताच हे पोस्टर आपल्या कलाकृतीची कॉपी असल्याची पोस्ट डिझायनर सचिन गुरव यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. आपण तयार केलेले पोस्टर आणि 'राक्षस' या चित्रपटाचे पोस्टर सारखे असल्याने आपण याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे सचिन गुरव यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकताना त्यांनी दोन्ही पोस्टरची तुलना केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या