'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टॅगलाईन असलेल्या 'वाघेऱ्या' गावात ऋषिकेश जोशी पुरता अडकला आहे ! आगामी 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे ऋषिकेश जोशी झळकणार आहे. धम्माल विनोदीपट असलेल्या या सिनेमात त्याची हटके भूमिका असून, 'वाघेऱ्या' नामक वेड्यांच्या गावात एका शहाण्या ऑफिसरच्या भूमिकेत तो दिसणार आहे.
ऋषिकेशबरोबरच, किशोर कदम, भारत गणेशपुरे, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज विनोदवीरांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हास्याची तुफान आतषबाजी करणाऱ्या या सिनेमातील 'वाघेऱ्या' गावाची गम्मत अनुभवायची असेल, तर येत्या १८ मे पर्यंत प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे. वेड्यांच्या या गावात जाण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित !