'तू तिथे असावे’ सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

संघर्ष माणसाला त्याच्या स्वप्नांपर्यंत, ध्येयापर्यंत नेऊ शकतो...नव्हे नव्हे संघर्ष करणारी माणसंच नेहमी यशस्वी होतात. या आशयाचा संदेश देणाऱ्या ‘तू तिथे असावे’ या आगामी मराठी चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच सिनेमातील गाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सिनेमात सहा गाणी

वेगवेगळ्या बाजाची सहा गाणी ‘तू तिथे असावे’ या चित्रपटात आहेत. गीतकार मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव, दौर सैफ यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीत दिलं आहे. आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, नेहा राजपाल, धनश्री बुरबुरे, गणेश पाटील यांचा सुमधूर आवाजात गाणी ध्वनीमुद्रीत करण्यात आली आहेत.

लवकरच येणार सिनेमा

भूषण प्रधान, पल्लवी पाटील, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, अरूण नलावडे, मोहन जोशी, जयवंत वाडकर, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे, मास्टर तेजस पाटील या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या