Movie Review : पोलीसरूपी माणसातील माणुसकीची कथा

आजवर बऱ्याच वास्तवदर्शी चित्रपटांनी समाजात घडणाऱ्या घटनांचा वेध घेत समाजमनावर आपला ठसा उमटवला आहे. 'लाल बत्ती' हा चित्रपटही वास्तववादी कथानकावर आधारित आहे. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर क्वीक रिस्पॅान्स टीम(क्यूआरटी)ची म्हणजेच शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली. या टीमचं कार्य नेमकं काय असतं आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना काय सहन करावं लागतं याची झलक या चित्रपटात पहायला मिळते. दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी शीघ्र कृती दलात कार्यरत असणाऱ्या पोलिसांची कथा या सिनेमात दाखवली आहे.

या सिनेमाला केवळ २६/११च्या अतिरेकी हल्ल्याची पार्श्वभूमी लाभली आहे. सिनेमाची कथा वास्तववादी असली तरी त्यात मनोरंजक मूल्यांचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळं सत्य आणि काल्पनिक घटनांची सांगड घातलेलं कथानक या सिनेमात पहायला मिळतं. थोडक्यात काय तर खाकी वर्दीतला माणूस दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे करण्यात आला आहे. मंगेश देसाईसारखा तगडा अभिनेता आणि त्याला उत्तम साथ देणारी कलाकारांची फळी आणि दमदार संवाद हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.

क्यूआरटी चीफ एस. बी. पवार (मंगेश देसाई)यांच्या दृष्टिकोनातून या सिनेमाची कथा उलगडत जाते. मॅाकड्रीलच्या सहाय्यानं अतिरेक्यांशी दोन हात करण्याचं ट्रेनिंग पोलिसांना देण्याची जबाबदारी पवारांकडं असते. पवारांच्या टीममध्ये गणेश धांगडे (तेजस)नावाचा एक कमांडो असतो. ज्याचं कायम गप्प रहाणं पवारांना खटकतं. गणेशच्या अबोल राहण्यामागील कारण शोधताना त्यांच्यासमोर एक वेगळंस सत्य येतं. तो धागा पकडून तपास करताना पोलीसरूपी पवारांमधील माणूस जागा होतो. त्यानंतर ते एका वेगळ्याच कामगिरीत स्वत:ला झोकून देतात असं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

सिनेमा सुरू झाल्यानंतर काहीतरी आश्चर्यजनक पहायला मिळेल असं वाटतं. त्यानुसार सुरुवातीला काही घटना घडतातही, पण नंतर नवनवीन ट्रॅक्स ओपन होतात आणि लेखक-दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचंय याबाबत मनात संभ्रम निर्माण होतो. मध्यंतरापर्यंत हाच खेळ सुरू राहतो. यात कधी पवारांच्या घरातील घटनांवर, तर कधी हवालदार कदमांच्या वैयक्तिक जीवनातील समस्यांवर प्रकाश टाकला जातो. पोलिसांना किती तणावाखाली काम करावं लागतं हे या घटनांच्या माध्यमातून दिग्दर्शकानं दाखवलं आहे. 'मूळात पोलीससुद्धा एक माणूस आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. खाकी वर्दी घातली की तो सुपरमॅन होत नाही' तसंच 'पोलिसांना मानसिक तपासाची नव्हे, तर मानसिक आधाराची गरज आहे' यांसारखे संवाद सिनेमाचं मर्म सांगण्यासाठी पूरक आहेत.

कर्तव्य बजावताना पोलीसांना वरिष्ठ अधिकारी, पत्रकार आणि मानवाधिकारवाल्यांना सामोरं जावं लागतंच, पण घरी पत्नीलाही जवाब द्यावा लागतो. या सर्वांमध्ये पोलिसांची मात्र कुचंबणा होते. खरं तर क्यूआरटीच्या माध्यमातून काही एन्काऊंटरच्या घटना पहायला मिळतील अशी या सिनेमाकडून अपेक्षा होती, पण तसं न घडल्यानं काही ठिकाणी उत्साह मावळतो. क्लायमॅक्समध्ये मात्र अतिरेक्यांना कंठस्नान घालण्याची घटना अत्यंत सुरेखपणे सादर करण्यात आल्यानं उत्सुकता वाढते. संपूर्ण सिनेमाभर वाजणारं 'विजयी हो...' हे गाणं चांगलं आहे. कॅमेरावर्कही सुरेख आहे. याखेरीज इतर तांत्रिक बाबीही चांगल्या आहेत.

मंगेश देसाईनं नेहमीच आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. या सिनेमात त्यानं साकारलेले पोलीस अधिकारी पवारही त्याला अपवाद नाहीत. सुरुवातीला कडक शिस्तीचे आणि नंतर माणूसकीच्या दृष्टिकोनातून सहकाऱ्यांकडे पाहणाऱ्या पवारांचं दुहेरी रूप मंगेशनं लीलया सादर केलं आहे. बऱ्याच दिवसांनी दिसलेल्या भार्गवी चिरमुलेनंही चांगलं काम केलंय. रमेश वाणींनी साकारलेले अधिकारी चव्हाणही लक्षात राहण्याजोगे आहेत. रहस्यमय कमांडो गणेशच्या भूमिकेत तेजसनं छान काम केलंय. याखेरीज मनोज जोशी आणि विजय निकम यांनी छोट्याशा भूमिकाही अगदी सहजपणे साकारल्या आहेत.

दिग्दर्शक गिरीश मोहितेंचा हा सिनेमा पोलिसांच्या अंतरंगात धगधगणाऱ्या लाल बत्तीवर प्रकाश टाकणारा आहे. पोलीसांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यांच्यातील माणूस जाणून घ्यायचा असेल तर हा सिनेमा नक्की पहायला हवा.

दर्जा : ***

...................................

मराठी चित्रपट : लालबत्ती

निर्माता : संतोष सोनावडेकर

कथा-पटकथा : अभय दखणे, संवाद : अरविंद जगताप

दिग्दर्शक : गिरीश मोहिते

कलाकार : मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, रमेश वाणी, मनोज जोशी, तेजस, विजय निकम, छाया कदम, मीरा जोशी, अनिल गवस, पूर्णिमा शिंदे, अजय जाधव, दीपा जाधव, सत्यवान करंगुटकर


पुढील बातमी
इतर बातम्या