स्वप्नील-मुक्ताने ढोल-ताशांच्या तालावर धरला 'गं साजणी...'चा ठेका

गाण्यांच्या रिमिक्सनंतर सध्या गाण्यांच्या रिक्रिएशनचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे आजच्या पिढीला जुन्या जमान्यातील गाणी नव्या ढंगात ऐकायला मिळत आहेत. याच वाटेवरचं नवा स्वरसाज लाभलेलं 'गं साजणी...' हे गाणं नुकतंच प्रकाशित झालं आहे.

७ डिसेंबरला होणार प्रदर्शित

७ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'मुंबई पुणे मुंबई ३' या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत प्रथमच एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं खास आकर्षण असलेल्या 'गं साजणी...' या गाण्याचं प्रकाशन झालं आहे.

१९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पिंजरा' या अजरामर चित्रपटातील हे मूळ गीत आहे. 'गं साजणी... कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी... आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी...' असे बोल असलेल्या या गीताचा समावेश 'मुंबई पुणे मुंबई ३' मध्ये करण्यात आला आहे.

गाण्यात दोघांची फुल्टू धमाल

मराठी चित्रपटसृष्टीत इतिहासात अजरामर झालेलं हे गीत या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. या दोघांनीही या गाण्यात फुल्टू धमाल केली आहे आणि त्यांचे हे नृत्य पाहण्यासारखं आहे. या गाण्याचं प्रकाशन ढोल ताशांच्या निनादात विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आलं. या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यासाठी स्वप्नील-मुक्तासह रोहिणी हट्टंगडी, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, विजय केंकरे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे हे कलाकार उपस्थित होते.

आगळ्या पद्धतीनं चित्रीत

प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या तुफान गाजलेल्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या 'पिंजरा' चित्रपटातील हे गाणे 'मुंबई पुणे मुंबई-३'मध्ये सामील करून ते आगळ्या पद्धतीने चित्रीत केलं गेलं आहे. 'पिंजरा'तील या गाण्याच्या चित्रपटातील समावेशामुळे रसिकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 'गं साजणी...' या गाण्याचं पुनरुत्थान करताना राम कदम, अविनाश-विश्वजीत त्याला स्वरसाज चढवला आहे, तर आदर्श शिंदेने आवाज दिला आहे. हे मूळ गाणं जगदीश खेबुडकर यांनी लिहिलं असून, त्यात विश्वजित जोशी यांनी भर घातली आहे. अतिरिक्त ऱ्हीदम प्रोग्रॅमिंग सुदेश गायकवाड यांचं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या