मैत्रीचं वेगळं रूप दर्शवणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचा ट्रेलर आणि गीताची झलक दाखवण्यात आली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती आणि एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ या सिनेमाचं दिग्दर्शन नागेश दरक आणि एस. आर. तोवर यांनी केलं आहे.
या सिनेमातील ‘निरंतर राहू दे’ या गाण्याचं लेखन संजाली रोडे यांनी केलं असून स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी स्वरबद्ध केलं आहे. कौतुक शिरोडकर लिखीत ‘नाचू बिनधास्त’ हे धमाकेदार गाणं आदर्श शिंदे, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केलं आहे. ‘ना जाने क्या हुआ है’ हे अभय इनामदार यांनी लिहिलेलं गाणं रोहित राऊत आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘जो दिल से किसी को’ हे सुफी प्रकारातलं गाणं कुकू प्रभास यांनी लिहिलं असून जावेद अली यांनी ते आपल्या आर्त स्वरात गायलं आहे.
गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. सोबत मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.