अपेक्षांची वेस न ओलांडलेला ‘रेस’

पुन्हा एकदा ईदच्या मुहूर्तावर ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खानचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी यंदा सलमान ‘रेस ३’च्या माध्यमातून त्यांच्या भेटीला आला आहे खरा, पण त्याची ही ‘रेस’ अपेक्षांची वेस ओलांडण्यात अपयशी ठरली आहे.

‘रेस’ सिरीजमधील यापूर्वीचे भाग पाहता हे सिनेमे पाहताना फारसं लाॅजिक न वापरता अचानक येणारे धक्के सहन करीत लॅव्हिश सिनेमाचा आनंद लुटणंच सोयीस्कर ठरतं. या सिरीजमधील हा तिसरा भाग भव्यतेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेला नसला तरी सिनेमाचा आत्मा असणारं कथानकच हरवल्यानं सर्व दमच निघून गेला आहे.

ही कथा आहे समशेर सिंग (अनिल कपूर) यांच्या कुटुंबाची. समशेर आपल्या शत्रूला अत्यंत चलाखीनं कशाप्रकारं नेस्तनाबूत करू शकतो, याची झलक दाखवणाऱ्या दृश्यानं या सिनेमाची सुरुवात होते. समशेरला सूरज (सकिब सलीम) आणि संजना (डेजी शाह) ही दोन जुळी मुलं आहेत, पण या दोघांपेक्षा त्याचा सावत्र मुलगाच सिकंदर (सलमान खान) समशेरसारखा धाडसी असतो. 

यश (बॅाबी देओल) हा सिकंदरचा खास मााणूस. बीजिंगमध्ये राहत असताना सिकंदरच्या आयुष्यात जेसिका (जॅकलिन फर्नांडिस) नावाची तरुणी येते. एक दिवस अचानक निघूनही जाते. सूरज आणि संजना यांचा सिकंदरवर मात करण्याचा अपयशी प्रयत्न सुरूच असतो. त्यात एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये राजकारण्यांनी केलेल्या अय्याशीच्या व्हिडीओचा अँगल घुसवून एक कथा तयार करण्यात आली आहे तो म्हणजे ‘रेस ३’ हा सिनेमा.

महागड्या गाड्या, आलिशान महाल, उंची कपडे, हॅलिकॅाप्टर्स, सिनेमातील व्यक्तिरेखांची अनपेक्षितपणे होणारी एंट्री, वेल प्लॅन्ड रॅाबरी, चित्तथरारक घटना, अप्रतिम कॅमेरावर्क, नयनरम्य लोकेशन्स, मनमोहक गीत-संगीत, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत आणि प्रचंड वेगात पुढे जाणारं कथानक ही ‘रेस’ सिरीजची आजवरची खासियत आहे. 

‘रेस ३’ या सिनेमात जरी हे सगळं असलं तरी बऱ्याच गोष्टींचा अभाव जाणवतो. कथानकाच्या नावाखाली ज्या भोवती हा सिनेमा बनवला आहे, त्यातील गुंता प्रसंगागणिक वाढतच जातो. बऱ्याच ठिकाणी पुढे काय घडणार याचा अंदाज अगोदरच येतो. त्यामुळे उत्कंठा राहत नाही. 

सिनेमाची लांबी हादेखील एक मायनस पॅाइंट आहे. या सर्व गोष्टींसाठी दिग्दर्शक या नात्यानं रेमो डिसूझा बऱ्याच अंशी जबाबदार आहे. गाड्यांचा पाठलाग आणि हाणामारीची दृश्यं चांगली झाली आहेत. नृत्य सामान्य दर्जाची आहेत. पार्श्वसंगीत चांगलं आहे. पण या सिनेमातील गाणी पूर्वीच्या भागांसारखी सहजपणे ओठांवर रुळणारी नाहीत.

विशेष म्हणजे कलाकारांची निवड ही या सिनेमाची सर्वात मोठी उणीव आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कलाकारांच्या जोडीला डेजी शाह आणि जॅकलिन फर्नांडिससारख्या प्रभावहिन नायिका या सिनेमात असल्यानं कलाकारांकडून फारशा अपेक्षा नव्हत्याच. ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, तो सलमान खानही फार थकलेला वाटतो.

या सिनेमात कुठेही सलमानचा जलवा दिसत नाही. बॅाबी देओलसाठी ही व्यक्तिरेखा पेलवणारी नव्हती, हे दिग्दर्शकाच्या लक्षात यायला हवं होतं. क्लायमॅक्सला शर्ट उतरवून दोघांमध्ये झालेली फाइटही निष्प्रभ वाटते. या सर्वांमध्ये अनिल कपूर यांनी एका वेगळ्या भूमिकेत लक्षवेधी अभिनय करत बाजी मारली आहे. सकिब सलीम, शरत सक्सेना यांनीही चांगलं काम केलं आहे. फ्रेडी दारूवालासारख्या कलाकाराला राणाच्या रूपात फारच महत्त्व नसलेली व्यक्तिरेखा देण्यात आली आहे.

‘ईद मुबारक’ असं म्हणत प्रदर्शित झालेला सलमानचा हा सिनेमा त्याच्या चाहत्यांनाही टाळ्या-शिट्ट्या वाजवण्याची फारशी संधी देणारा नाही. असं असलं तरीही ईद एन्जॅाय करण्यासाठी सलमानचे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करतीलच.

दर्जा - **१/२


सिनेमा : रेस-३

कलाकार : अनिल कपूर, सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, डेजी शहा, सकिब सलीम, फ्रेडी दारूवाला, शरत सक्सेना

दिग्दर्शक : रेमो डिसूझा

पुढील बातमी
इतर बातम्या