‘सॉरी’ मांडणार नाट्यकर्मीची कथा

आजच्या इंग्रजाळलेल्या प्रादेशिक भाषांमध्येही सॅारी हा शब्द इतका रूळलाय की भविष्यात हा शब्द प्रत्येक प्रादेशिक भाषेतील मूळ शब्दाला मात देईल की काय असं वाटतं. हाच सॉरी शब्द एखाद्याच्या आयुष्यात भिनला की काय होतं? ते लवकरच रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. वायडीजी फिल्म्सची निर्मिती असलेला ‘सॉरी’ हा मराठी सिनेमा ६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

काय आहे सिनेमाची कथा?

‘सॉरी’ ही एका तरूण नाट्यकर्मीची कथा आहे. या सिनेमाची कथा सौरभ नावाच्या एका तरूणाभोवती गुंफण्यात आली आहे. हा तरूण नाटयलेखक आहे. नाटक लिहीता लिहीता त्याच्या जीवनात कशा नाटयमय घटना घडतात याचं चित्रण ‘सॉरी’ या सिनेमात करण्यात आलं आहे.

या सिनेमाचा तरूण हा आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्त्व करणारा आहे. मनाची घालमेल करणारा एक अवघड विषय ‘सॉरी’च्या निमित्ताने रूपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याला सर्व प्रकारच्या मनोरंजक मूल्यांची अचूक जोड देण्यात आली असल्याने कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल अशी आशाही गोसावी यांनी व्यक्त केली.

निर्माता कोण?

वायडीजी बॅनरअंतर्गत निर्माते योगेश दत्तात्रय गोसावी यांनी ‘सॉरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनीच लेखन, दिग्दर्शन आणि संकलन या सिनेनिर्मितीतील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. तर सौरभ चिरमुल्ला, सुलक्षणा राय, समृद्धी पाचे, पूजा मेश्राम, माही कपूर, चंद्रकांत बामणे, डॉ. संजीवकुमार पाटील आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

येथे झालं चित्रीकरण

या चित्रपटाचे चित्रीकरण सात राज्यांमधील ४५ लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. यात जामा मस्जिद, पणजीतील बासालिका ऑफ बोम्स चर्च, धर्मशालातील बौद्ध मंदिर, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं प्रसिद्ध वैजनाथ शंकर मंदिर, अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर या पाच महत्त्वाच्या विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे.

निर्माता-दिग्दर्शक योगेश गोसावी यांनी आजच्या पिढीला डोळयांसमोर ठेवून हा सिनेमा बनवला आहे. आजच्या पिढीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. ‘सॉरी’ या सिनेमाबाबत बोलताना गोसावी म्हणाले की, एखादी व्यक्ती कामाच्या आहारी गेली की त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. याच्या उलटअर्था बोलायचं तर एखादं काम मनापासून केलं की ते मनात भिनतं. यातून चांगल्याचीही निर्मिती होते आणि वाईटही घडतं. हाच धागा पकडून ‘सॉरी’ या सिनेमाची कथा लिहिण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या