कोरोनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' अभिनेत्रीचं निधन

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं छाप सोडणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं. त्या ५८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाचे निदान झाले होते.

सेव्हन हिल रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे. माधवी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

माधवी या अनुपमा या हिंदी मालिकेत काम करत होत्या. या मालिकेत त्या अनुपमाच्या आईची भूमिका साकारत होत्या. पण कोरोनामुळे त्या रुग्णालयात दाखल असल्यानं त्यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रींना घेण्यात आलं होतं.     

माधवी गोगटे यांनी मराठी चित्रपटांसोबतच अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकेही फार गाजली.

माधवी यांनी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतही ‘घनचक्कर’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

माधवी गोगटे यांनी रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. ‘घनचक्कर’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. याच चित्रपटानं त्यांना ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘सत्वपरीक्षा’ या चित्रपटातही त्यांनी काम केलं.


पुढील बातमी
इतर बातम्या