शिवडी - मतदानाचा टक्का वाढावा म्हणून महानगरपालिकेच्या वतीने विविध जनजागृती मोहीम राबवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर उमेदवारांनी प्रचार करून मतदान करा असं आवाहन देखील केलं होतं. त्यानुसार मंगळवारी मतदान करण्यासाठी अनेक मतदार आवर्जून घराबाहेर पडले. पण, मतदान केंद्रावर यादीत आपले नाव नसल्याने अनेकांनी पालिकेविरोधात संताप व्यक्त केला.
प्रथम मतदान मग काम अशी भूमिका घेऊन सकाळीच घराबाहेर पडलेल्या अनेक मतदारांना यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना आवाहन करण्यासाठी घोषणाबाजी किंवा उपयोजनेमध्ये वेळ वाया घालविण्यापेक्षा मतदार यादीकडे लक्ष देण्याची गरज होती अशा संतप्त प्रतिक्रिया शिवडी पश्चिम येथील कीर्ती महानगरपालिका शाळेच्या केंद्रात मतदानासाठी आलेल्या मतदारांनी व्यक्त केल्या.