मुंबईतले आमदार दहशतवाद्यांच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले

महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये अभ्यासदौऱ्यासाठी गेलेल्या ५ आमदारांसह काही शासकीय अधिकारी दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यामध्ये मुंबईतल्या मानखुर्द विधानसभा क्षेत्रातील आमदार तुकाराम काते यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात कुणालाही इजा झाली नसल्याची माहिती काते यांनी 'मुंबई लाइव्ह'सोबत बोलताना दिली.

कशासाठी अभ्यासदौरा?

पंचायत राज समितीच्या कामानिमित्त महाराष्ट्रातील ५ आमदार १९ मे रोजी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले. हा दौरा २६ मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात जम्मू काश्मीरमधील नागरी सुविधा, शाळा इ.चा अभ्यास करत आहेत.

कुठल्या आमदारांचा समावेश?

यामध्ये शिवसेनेचे किशोर आप्पा पाटील (पाचोरा, जळगाव) आणि तुकाराम काते (मानखुर्द, मुंबई), राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण (फलटण, सातारा) आणि विक्रम काळे (औरंगाबाद शिक्षक मतदार संघ) तसंच भाजपाच्या सुधीर पारवे (उमरेड, नागपूर) यांचा समावेश आहे.

नेमकं काय झालं?

हे सर्व आमदार, शासकीय अधिकारी आणि इतर. श्रीनगरच्या दिशेने वाहनातून जात असताना आमदारांच्या वाहनापुढे अचानक ग्रेनेड हल्ला झाला. सुदैवाने या हल्ल्यात वाहनात बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही.

एकूण ७ गाड्यांचा ताफा श्रीनगरच्या दिशेने जात असताना आमच्या बसपुढील मिलिटरी व्हॅनपुढे ग्रेनेडचा हल्ला झाला. या हल्ल्यात दोन गाड्यांचे टायर, काचा फुटून गाड्यांचं जबर नुकसान झालं. सुदैवाने गाडीत बसलेल्या २५ सदस्यांना कुठलीही इजा झाली नाही.

- तुकाराम काते, आमदार


हेही वाचा-

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपात


पुढील बातमी
इतर बातम्या