आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई महापालिकेसहित राज्यातील सर्व पालिकांच्या आर्थिक स्त्रोतांबाबत जीएसटीच्या विधेयकात योग्य ती तरतूद केल्याबद्दल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विधान भवनामध्ये जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत आभार मानले.

विधिमंडळातील जीएसटीवरील चर्चाही आदित्य ठाकरे यांनी प्रेक्षक गॅलरीत बसून ऐकली. त्यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरही होते. आदित्य प्रेक्षक गॅलरीत हजर असताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची फटकेबाजी सुरु होती. सुधीर मुनगंटीवार यांनी मातोश्रीवर जीएसटीबाबत बैठक घेतल्यावरून शिवसेना आणि भाजपाला त्यांनी भाषणात चिमटे काढले. यानंतर विधानसभेत कधीही आक्रमकपणे भाषण न करणारे सुनील प्रभू यांनीही जीएसटीवर आक्रमकपणे भाषण केले.

जीएसटी विधेयकावरून शिवसेनेने महापालिकेला वाटी घेऊन केंद्राच्या दारात उभे रहावे लागत असेल तर पाठिंब्याबद्दल विचार करावा लागेल, अशी भूमिका घेतली होती. यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेच्या मुद्द्यांनुसार जीएसटी विधेयकामध्ये सुधारणा केल्याचे म्हटले जात होते.

पुढील बातमी
इतर बातम्या